मुंबई: गेल्या काही दिवसांपासून 'हिंदी सक्तीवर' महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलं आहे. 'काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती लागू होऊ देणार नाही', असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. मनसे पक्षातर्फे येत्या 6 जुलै रोजी हिंदीविरोधी मोर्चा काढला जाणार आहे. अशातच, हिंदी भाषा सक्तीवर जेष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
काय म्हणाले शरद पवार?
'प्राथमिक शिक्षणात हिंदीचे सक्तीकरण नसावे, हाच सर्वांचा आग्रह आहे. पाचवीनंतर हिंदी शिकवण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र, लहान मुलांवर भाषेचा ताण देणं कितपत योग्य आहे, याचा देखील विचार करावा लागेल,' अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
हेही वाचा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 151 वी जयंती
ठाकरे बंधूंच्या स्टेटमेंटवर शरद पवारांची प्रतिक्रिया?
'मी ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट पाहिलं. ते काहीही चुकीचं बोलले नाही. कोणत्या टप्प्याला हिंदी हवी आणि नको, हे त्यांनी सांगितलं. मोर्चाबाबत मला अजून कोणी सांगितलं नाही. हिंदी सक्तीचा विषय कुणी एक पक्ष हाती घेऊ शकत नाही. याबाबत आम्ही इतर पक्षांशी चर्चा करणार आहोत. आमचा विचार नकारात्मक नाही,' असं देखील शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले:
'त्रिभाषा सूत्रा संदर्भात कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते तसेच संबंधित घटकांशी सखोल चर्चा केली जाईल,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी हिंदी भाषा सक्तीवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारच्या धोरणात्मक भूमिकेवरही चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व भागधारकांशी संवाद साधल्यानंतर, देशातील इतर राज्यांमधील त्रिभाषा धोरणाची अंमलबजावणी आणि परिस्थिती जनतेसमोर मांडली जाईल. त्यामुळे, हिंदी सक्तीवर सरकार कोणते महत्वपूर्ण निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.