मुंबई : प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थान असलेल्या सागर बंगल्यावर गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर अदानी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अदानी यांनी त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योजक अदानी यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली असल्याची माहिती आहे. राज्यात अदानी यांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. धारावी पुनर्विकासाचा प्रकल्पदेखील अदानी समूहाकडे आहे. गौतम अदानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चांना सुरूवात झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक अदानी यांच्यात कोणत्या मुद्द्यावर चर्चा
गौतम अदानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांणा उधाण आले आहे. दोघांमध्ये उद्योग आणि रोजगाराबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकल्प सुरू होत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची जबाबदारीही अदानी समूहाकडे आहे. येत्या काही महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी सुरू होणार आहेत. तसेच धारावी पुनर्विकासाचा प्रकल्पदेखील अदानी समूहाकडे आहे. काही मुद्दे समोर करत धारावीकरांनी पुनर्विकासाच्या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील जमीनी अदानींना देण्याचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला होता.
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी जोरदार कामाला सुरूवात केली आहे. विधानभवन येथील समिती सभागृहात मुख्यमंत्री यांनी अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी वरीष्ठ अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. सरकारच्या आगामी वाटचालीची स्पष्ट दिशा ठरवत, महाराष्ट्राला क्रमांक 1 वर ठेवण्यासाठी थांबू नका, असा मंत्र त्यांनी दिला. राज्याची गती वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्प, वॉररूम्स, आणि लोकाभिमुख योजनांवर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.