Dhananjay Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांनीही राजकीय संन्यासाबाबत सूचक विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "सध्याचे राजकारण अत्यंत खालच्या थराला गेले आहे. सर्वत्र केवळ जात आणि धर्माच्या नावावर राजकारण चालले असून, अशा गढूळ वातावरणात आपण खरोखर राजकारणात राहावे की नाही, असा प्रश्न पडतो," अशी उद्विग्नता त्यांनी बोलून दाखवली.
महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा आणि संघर्षाचा निर्धार
राजकारणातील सध्याच्या स्वरूपावर निराशा व्यक्त केल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी सामाजिक दायित्वाची आठवण करून दिली. समाजात पुन्हा समता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी महापुरुषांनी दिलेला विचार पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी राजकारणात टिकून राहून जनतेसाठी काम करत राहण्याचे स्पष्ट संकेत दिले. पंकजा मुंडे यांनी परळीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वैतागून निवृत्तीची भावना व्यक्त केली होती, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी राजकीय मूल्यांच्या हासावर बोट ठेवत हाच धागा पकडला.
बीडच्या राजकारणात उलट-सुलट चर्चांना उधाण
एकीकडे पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांना भाजप सोडल्यास पहिल्या महिला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनीही राजकीय निवृत्तीवर भाष्य केले. बीड जिल्ह्यातील या दोन्ही अत्यंत प्रभावशाली भावंडांनी लागोपाठ राजकीय संन्यासाचे संकेत दिल्याने आगामी काळात बीडचे आणि राज्याचे राजकारण कोणत्या दिशेने वळणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.