Dattatray Bharne: राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला काहीसा उशीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शासनाने यापूर्वी दिलेली 30 जून आणि त्यानंतरची 5 जुलै ही डेडलाईन हुकल्यामुळे विरोधकांनी या योजनेवर सडकून टीका केली असून, याला 'फसवी कर्जमाफी' असे म्हटले आहे. या वाढत्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शासकीय विलंबामागची खरी कारणे स्पष्ट करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्याच्या इंदापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कृषीमंत्र्यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेला उशीर झाल्याची प्रांजळ कबुली दिली आहे. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, पुरवणी मागण्यांद्वारे या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या निधीला मंजुरी दिली जात आहे. ही शासकीय प्रक्रिया पूर्ण होताच आणि राज्यपालांची स्वाक्षरी मिळताच, कर्जमाफीची रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
कोणत्याही त्रुटींशिवाय गरजूंपर्यंत लाभ पोहोचवण्याचा सरकारचा मानस
योजनेला चार ते दोन दिवस उशीर झाला असला, तरी यामागे सरकारचा उद्देश पूर्णपणे पारदर्शक कारभार करण्याचा आहे, असे कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ हा केवळ आणि केवळ गरजू व गरीब शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचायला हवा. खात्यांमध्ये पैसे जमा करताना कोणतीही तांत्रिक चूक किंवा गडबड होऊ नये, म्हणूनच प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याची संपूर्ण माहिती अत्यंत काळजीपूर्वक तपासली जात आहे. याच सुरक्षेच्या कारणास्तव प्रक्रियेत थोडा वेळ जात असल्याचे भरणे यांनी सांगितले.
कोणत्याही निवडणुकीशिवाय शेतकऱ्यांना ऐतिहासिक मदत; मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
सध्या राज्यात कोणतीही निवडणूक नसताना केवळ शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून मंत्रिमंडळाने हा मदतीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, याकडे कृषीमंत्र्यांनी लक्ष वेधले. तांत्रिक अडचणींचे ढग आता लवकरच दूर होणार असून, येत्या अवघ्या काही दिवसांतच कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडतील, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.