Eknath Shinde: बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर, आता या निकालाला केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज यासंदर्भात मोठी घोषणा केली. “हा अतिशय गंभीर आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारा खटला होता. आरोपींना शिक्षा होईल अशी सर्वांनाच खात्री होती, परंतु दुर्दैवाने हा निकाल असा लागला. आम्ही निंबाळकर कुटुंबाच्या पाठीशी असून या निकालाविरोधात सीबीआय तात्काळ वरच्या न्यायालयात दाद मागणार आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Omraje Nimbalkar : ‘त्या पाच खासदारांची धाकधूक वाढली’; ओमराजे निंबाळकरांचं पेचात टाकणारं वक्तव्य
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा; सीबीआयला निर्देश
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या खटल्याचा निकाल आल्यानंतर त्यांनी स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधला. या गंभीर हत्याकांडाची पार्श्वभूमी आणि निकालाबाबत त्यांनी अमित शाह यांना सविस्तर माहिती दिली. यावर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या प्रकरणाच्या विरोधात सीबीआय तात्काळ वरिष्ठ न्यायालयात अपील करेल, असा विश्वास दिला असून त्याबाबतचे आवश्यक निर्देशही सीबीआयला देण्यात आले आहेत.
’20 वर्षांनंतर लागलेला निकाल दुर्दैवी’
शिंदे यांनी या प्रकरणावर तीव्र भावना व्यक्त करताना सांगितले की, “गेल्या 20 वर्षांपासून हा खटला सुरू होता. यामध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्याला संपवण्यात आलं होतं. या हत्याकांडामुळे निंबाळकर कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. वरिष्ठ न्यायालयात या अन्यायाविरुद्ध आम्ही पूर्ण ताकदीने लढा देऊ.”