NCP Merger: राज्य आणि केंद्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांतील महत्त्वाच्या भेटीगाठींनंतर आता पक्षाची पुढील रणनीती आणि दिशा ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची आणि तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षाची भविष्यातील भूमिका, महाविकास आघाडीतील स्थान आणि दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याबाबतच्या शक्यतेवर सविस्तर चर्चा होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पार्थ पवार आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर हालचालींना वेग
काही दिवसांपूर्वीच पार्थ पवार यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत राज्य पातळीवरील आणि राष्ट्रीय स्तरावरील सध्याच्या राजकीय वातावरणावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीनंतर पक्षांतर्गत हालचालींना कमालीचा वेग आला असून पार्थ पवार यांनी विविध पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धराका लावला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
29 ऑगस्टच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांचे पुनर्मिलन होणार का, अथवा पक्ष आगामी काळात कोणती भूमिका घेणार, यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यापूर्वी एनडीए किंवा इतर पक्षांसोबत जाण्याच्या चर्चा शरद पवार यांनी स्पष्टपणे फेटाळून लावल्या असल्या, तरी विविध नेत्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या भेटींमुळे पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.