Ayodhya Ram Mandir: अयोध्याही तापली! रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत 60 टक्क्यांनी घट

कडाक्याच्या उन्हामुळे राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत 60 टक्क्यांहून अधिक घट झाली असून, हा आकडा आता 40,000 च्या खाली घसरला आहे.

Ayodhya Ram Mandir: अयोध्याही तापली! रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत 60 टक्क्यांनी घट

Ayodhya Ram Mandir: उत्तर भारतात सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून, वाढत्या तापमानाचा थेट परिणाम अयोध्येतील राम मंदिर दर्शनावर झाला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत 60 टक्क्यांहून अधिक घट झाली असून, हा आकडा आता 40,000 च्या खाली घसरला आहे. या पार्श्वभूमीवर, मंदिर प्रशासन आणि महानगरपालिकेने भाविकांना उन्हापासून दिलासा देण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत.

भाविकांच्या संख्येत मोठी घट; प्रशासनाकडून 'वॉटर स्प्रिंकलर'चा वापर
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरवी दररोज 1,00,000 हून अधिक भाविक प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी येत असत. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे आता ही संख्या निम्म्याहून कमी झाली आहे. अयोध्येचे महापौर गिरीश पती त्रिपाठी यांनी सांगितले की, भाविकांना उन्हापासून वाचवण्यासाठी 'राम पथ' आणि परिसरातील रस्त्यांवर स्प्रिंकलर यंत्रांच्या साहाय्याने पाण्याचा फवारा मारला जात आहे. तसेच, मंदिर ट्रस्टने 3,000 भाविक बसू शकतील असे भव्य वातानुकूलित (AC) प्रतीक्षागृह देखील उभारले आहे.

रामलल्लाच्या नैवेद्यात बदल; आहारात लस्सी आणि फळांच्या रसाचा समावेश
वाढत्या उष्णतेचा विचार करून मंदिर प्रशासनाने केवळ भाविकांसाठीच नव्हे, तर 'रामलल्ला' यांच्या दैनंदिन उपचारांमध्येही बदल केले आहेत. राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी माहिती दिली की, रामलल्ला यांना आता नैवेद्यात विशेषतः थंड लस्सी आणि आंब्याचा रस अर्पण केला जात आहे. याव्यतिरिक्त, सोन्याच्या पात्रातून मध, दही, तूप आणि पाण्याचे थंड मिश्रणही अर्पण केले जात आहे.

हेही वाचा – How to reach Kedarnath Dham a: केदारनाथ यात्रा करायची आहे? कसं जायचं.. विमान, रेल्वे की बस? जाणून घ्या प्रवासाचा संपूर्ण रूटमॅप

गर्भगृहात एअर कुलर्स; सुती वस्त्रांनी प्रभूंचा साज
मंदिराच्या गर्भगृहातील वातावरण थंड राखण्यासाठी विशेष एअर कुलर्स बसवण्यात आले आहेत. उन्हाळ्याचा विचार करून रामलल्लाच्या मूर्तीला आता जड दागिन्यांऐवजी हलक्या सुती किंवा रेशमी वस्त्रांनी सजवले जात आहे. तसेच, प्रभूंच्या स्नानासाठीही थंड पाण्याचा वापर केला जात असून, त्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी दैनंदिन पूजा आणि आरतीच्या पद्धतींमध्ये प्रशासनाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या सर्व सुविधांमुळे दुपारी येणाऱ्या भाविकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number