महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात असलेले भगवान शंकराचे प्राचीन आणि पवित्र श्री औंढा नागनाथ मंदिर पुढील एक महिन्यासाठी सामान्य भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. मंदिरात सुरू असलेल्या दुरुस्ती आणि जीर्णोद्धाराच्या कामामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, भाविक आणि पर्यटकांनी याची नोंद घ्यावी. औंढा नागनाथ मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग मानले जाते.
काय आहे कारण?
हिंगोली जिल्ह्यातील या ज्योतिर्लिंगाच्या गर्भगृहातील दर्शन महिनाभर बंद राहणार आहे. 5 ऑक्टोबरपासून पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून गर्भगृहातील भिंती, खांब आणि दगडी वास्तूची स्वच्छता व संवर्धनाचे काम हाती घेतले जाणार आहे. वर्षानुवर्षे साचलेले तेल, कुंकू, हळद आणि पूजेच्या साहित्याचे थर विशेष रासायनिक प्रक्रियेद्वारे काढले जाणार आहेत.
मंदिर जरी भक्तांसाठी बंद असले तरी भगवान नागनाथांची सकाळची आणि दुपारची नित्य पूजा नियमित सुरू राहणार आहे. मूळ प्राचीन वास्तूला कोणतीही हानी होऊ नये, याची विशेष काळजी घेत हे संवर्धनाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.