Dussehra 2026: हिंदू संस्कृतीत विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा सण अत्यंत पवित्र आणि मंगलकारक मानला जातो. यंदा 20 ऑक्टोबर 2026 रोजी हा सण राज्यभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. एरव्ही वर्षभर आपण ज्या आपट्याच्या पानांकडे फारसे लक्ष देत नाही किंवा पूजेत वापरत नाही, तीच पाने दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देऊन ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ अशा शुभेच्छा दिल्या जातात. या परंपरेला ‘सोनं लुटणे’ असे म्हटले जाते. या विशेष प्रथेमागे आणि आपट्याच्या पानांना सोन्याचे स्वरूप मिळण्यामागे एक अत्यंत रंजक आणि संस्कारक्षम पौराणिक कथा दडलेली आहे.
कौत्स आणि वरतंतु ऋषी यांची गुरुदक्षिणेची गोष्ट; 14 कोटी सुवर्णमुद्रांची मागणी
पौराणिक कथेनुसार, पैठण शहरातील देवदत्त नावाच्या ब्राह्मणाचा कौत्स हा एक हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. त्या काळात ऋषींच्या म्हणजे गुरुच्या घरी राहूनच विद्या संपादन करण्याचा परिपाठ होता. तो शिक्षण घेण्यासाठी ऋषी वरतंतु यांच्या आश्रमात राहिला. हुशार असल्यामुळे कौत्साने अल्पावधीतच सर्व शास्त्रांमध्ये प्राविण्य मिळवले. गुरुंचा आश्रम सोडताना काय गुरुदक्षिणा द्यावी, या विचारात पडून त्याने शेवटी गुरुंनाच ‘मी काय गुरुदक्षिणा द्यावी?’ असे विचारले. यावर गुरु म्हणाले, ‘गुरुदक्षिणा मिळावी, म्हणून मी तुला विद्या शिकवली नाही. शिष्य विद्या उत्तम शिकला की गुरुला गुरुदक्षिणा मिळाली.’ पण या उत्तराने कौत्साचे समाधान झाले नाही. तो पुन्हा पुन्हा काय गुरुदक्षिणा देऊ, विचारत राहिला.
शेवटी वरतंतु म्हणाले, ‘मी तुला चौदा विद्या शिकवल्या. प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी याप्रमाणे मला तू चौदा कोटी सुवर्णमुद्रा आणून द़े पण त्या अनेकांकडून जमा केलेल्या नकोत. एकाच दात्याकडून आणलेल्या असल्या पाहिजेत.’
राजा रघुची औदार्यवृत्ती आणि कुबेराकडून झालेला सुवर्णमुद्रांचा वर्षाव
गुरुंची ही कठीण अट पूर्ण करण्यासाठी कौत्स हा प्रभू श्रीरामांचे पूर्वज असलेल्या उदार आणि प्रजाहितदक्ष राजा रघु यांच्याकडे गेला. मात्र, राजा रघुने नुकत्याच केलेल्या यज्ञातील दानामुळे त्यांची तिजोरी पूर्णपणे रिकामी झालेली होती. दारी आलेला याचक खाली हाताने परत जाऊ नये म्हणून राजाने स्वर्गाचा राजा इंद्रावर चाल करण्याची तयारी दर्शवली. राजा रघुचा हा निश्चय पाहून घाबरलेल्या इंद्राने धनपती कुबेराला अयोध्येच्या वेशीवर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर सुवर्णमुद्रांचा धुवांधार वर्षाव करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा – दसरा-दिवाळीत झाडू का खरेदी करतात? लक्ष्मी प्रसन्न होण्यामागील धार्मिक महत्त्व जाणून घ्या!
कौत्साची निःस्पृहता आणि विजयादशमीच्या दिवशी ‘सोनं लुटण्याची’ सुरुवात
झाडांवरून मिळालेल्या सर्व 14 कोटी सुवर्णमुद्रा घेऊन कौत्स आपल्या गुरुंकडे पोहोचला. मात्र ऋषी वरतंतुंनी केवळ आपल्या मागणीनुसार 14 कोटी सुवर्णमुद्रा स्वीकारल्या आणि उरलेल्या सर्व सुवर्णमुद्रा कौत्साला परत दिल्या. कौत्साने त्या अतिरिक्त सुवर्णमुद्रा स्वतःकडे न ठेवता राजा रघुला परत देण्याचा प्रयत्न केला, पण राजानेही त्या घेण्यास नकार दिला. शेवटी कौत्साने त्या सर्व सुवर्णमुद्रा पुन्हा त्याच आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली नेऊन ठेवल्या आणि तिथल्या ग्रामस्थांना त्या वाटून दिल्या. तो दिवस विजयादशमीचा होता, आणि तेव्हापासून या झाडांची पाने ‘सोनं’ म्हणून देण्याची प्रथा सुरू झाली.
त्यागाची आणि नीतिमत्तेची शिकवण देणारा सण; वैचारिक सोने लुटण्याचे आवाहन
ही पौराणिक कथा केवळ एका परंपरेचा उलगडा करत नाही, तर आपल्या संस्कृतीतील महान मूल्यांचे दर्शन घडवते. यामध्ये गुरुचे ऋण फेडण्यासाठी शिष्याची असलेली प्रामाणिक तडप, ज्ञानाची पैशात तुलना न करण्याचा गुरुचा विचार, आणि गरज नसतानाही मिळालेल्या धनाचा त्याग करण्याची कौत्स व राजा रघु यांची निरिच्छा दिसून येते. त्यामुळेच दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने देताना केवळ औपचारिकतेचा भाग न ठेवता त्याग, नम्रता आणि निस्वार्थ प्रेमाचे हे ‘वैचारिक सोने’ प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अंगीकारणे गरजेचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.