Kartik Purnima 2025: हिंदू पंचांगातील कार्तिक महिना आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्याच्या शेवटच्या तिथीला येणारी कार्तिक पौर्णिमा भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. या तिथीला देव दीपावली साजरी केली जाते. वर्षातील अनेक महत्त्वाच्या तिथींमध्ये कार्तिक पूर्णिमा ही सर्वात सद्गुणी मानली जाते. 2025 मध्ये ही तिथी बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी गंगा स्नान, धर्मादाय कृती, आणि दीपदान या तीन गोष्टींना विशेष धार्मिक पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं.
ज्योतिष आणि धार्मिक मतानुसार, या दिवशी स्वर्गातील देवसंघ काशीच्या गंगाघाटावर उतरतात, त्यामुळे काशी नगरी या रात्री अक्षरशः प्रकाशाने झगमगते. हजारो दीपांच्या प्रकाशात घाट सजतो आणि भक्त प्रभू शिव-विष्णूंच्या चरणी पूजन-अर्चना करतात. हा उत्सव प्रकाश, श्रद्धा, दान आणि भक्तीचा मिलाप समजला जातो.
या वर्षीची (2025) कार्तिक पौर्णिमा तिथी आणि वेळा
कार्तिक पूर्णिमा 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:36 वाजता सुरू होईल आणि 5 नोव्हेंबर रोजी सायं 6:48 वाजता समाप्त होईल. उदयतिथि 5 नोव्हेंबर असल्याने देव दीपावली साजरी करण्याचा मुख्य दिवस हा बुधवार, 5 नोव्हेंबर असेल.
विशेष मुहूर्त: स्नान, दान, दीपदान
-
देव दीपावली प्रदोष काळ: संध्या 5:15 ते 7:50
-
स्नान मुहूर्त : सूर्योदयपासून संध्या 5:01 पर्यंत
-
दान मुहूर्त : सूर्योदय ते संध्या 5:12 पर्यंत
-
दीपदान मुहूर्त : संध्याकाळी 5:15 ते 7:51
-
ब्रह्म मुहूर्त : पहाटे 4:46 ते 5:37
-
विजय मुहूर्त : दुपार 1:56 ते 2:41
-
संधिप्रकाशमुहूर्त : संध्या 5:40 – 6:05
-
चंद्रोदय : रात्री 7:20
या दिवशी गंगेवर स्नान करण्याचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं असलं तरी प्रत्यक्ष घाटावर जाता आले नाही तर, स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळूनही विधीसंपन्न पूजन करता येतं. पूजा केल्यानंतर तुलसीच्या रोपट्याजवळ दीप लावण्याच्या विधीला विशेष महत्व आहे.
धर्मशास्त्रात या दिवशी काही विशिष्ट वस्तूंच्या दानाला सर्वाधिक पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. त्यात आवळा, तिळ, गूळ, आणि वस्त्र दान या गोष्टी विशेष महत्त्वाच्या आहेत.
कार्तिक पौर्णिमा का विशेष?
वर्षातील प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा असली तरी कार्तिक पूर्णिमा ही देवांच्या उत्सवासोबत येते म्हणून ती सर्वोच्च मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार ही रात्र आध्यात्मिक साधनेसाठी, ध्यानासाठी, आणि पॉझिटिव्ह कॉस्मिक एनर्जी ग्रहण करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे या दिवसाची रात्र वर्षातील सर्वात पवित्र आणि दिव्य रात्रींपैकी एक समजली जाते.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)