Pandharpur VIP Darshan: पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात सर्वसामान्य भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी दर्शनाला तात्पुरती बंदी घालण्यात आल्यानंतर आता रांगेत उभ्या असलेल्या वारकऱ्यांना थेट देवासमोर बसून शांतपणे दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे “आज खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला” अशा भावना भाविक व्यक्त करत आहेत.
अधिकमासामुळे पंढरपुरात प्रचंड गर्दी
सध्या पुरुषोत्तम अर्थात अधिकमास सुरू असल्याने पंढरपुरात दररोज लाखो भाविक दाखल होत आहेत. आषाढी वारीसारखीच गर्दी मंदिर परिसरात पाहायला मिळत असून, दररोज सात ते आठ लाख भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या निर्णयाची कठोर अंमलबजावणी सुरू केल्यानंतर मंदिरातील वातावरणात मोठा बदल दिसून येत आहे.
VIP जागी आता वारकऱ्यांना संधी
यापूर्वी मंदिरातील नित्योपचार आणि पूजेच्या वेळेत अनेक व्हीआयपी व्यक्तींना देवासमोर बसून दर्शन घेण्याची संधी दिली जात होती. मात्र आता त्याच जागी सामान्य वारकरी आणि भाविकांना बसून विठ्ठलाचे दर्शन घेता येत आहे. दर्शनासाठी तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना देवासमोर काही क्षण शांतपणे बसण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. अनेक वारकऱ्यांनी “इतकी वर्षे वारी केली, पण असा अनुभव कधी मिळाला नव्हता,” अशा भावना व्यक्त केल्या.
दर्शनासाठी लागणारा वेळही कमी
व्हीआयपी दर्शन बंद केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांची रांग अधिक वेगाने पुढे सरकत असल्याचे दिसत आहे. मंदिराबाहेर दर्शनासाठी रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचत असल्या तरी पूर्वीच्या तुलनेत भाविकांना कमी वेळेत विठ्ठलाच्या चरणी पोहोचता येत आहे. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे केवळ दर्शन प्रक्रिया वेगवान झाली नाही, तर भक्तांना अधिक शांत आणि समाधानी वातावरणात विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा अनुभव मिळू लागला आहे. त्यामुळे वारकरी वर्गातून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे.