Devendra Fadnavis Year 2026 : प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ पंडित राजकुमार शर्मा यांनी जय महाराष्ट्रच्या ‘कॉफी वुईथ कदम’ या विशेष कार्यक्रमात उपस्थिती लावली. या वेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्र, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली. या गप्पांमध्ये त्यांनी अनेक घटनांचे ज्योतिषशास्त्रीय संदर्भही सांगितले.
पंडित शर्मा म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाची कुंडली आणि प्रवास पाहिला तर, पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 मध्ये झाली. मोदीजींची वृश्चिक रास, भारताची कर्क रास, देवेंद्र फडणवीसांची कुंभ रास, मंगळाची महादशा या सर्वांचा एकत्रित विचार केला तर भारतीय जनता पक्षाची विजयी घोडदौड सुरूच राहणार आहे.’
‘यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कुंडली काय सांगते? त्यांच्यासाठी 2026 कसं असेल?’ या प्रश्नावर बोलताना शर्मा यांनी फडणवीसांच्या राजकीय प्रवासाचे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण केले. ते म्हणाले, ‘2019 मध्ये केतूच्या महादशेमुळे त्यांना सत्ता गमवावी लागली होती. मात्र, 2024मध्ये त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. फडणवीस यांची कुंभ रास असून त्यांच्यावर सध्या साडेसातीचा प्रभाव आहे, तरीही त्यांच्या कार्यक्षमतेमुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे.’
अटलजी आणि मोदीजींसोबत तुलना
त्यांच्या मते, महाराष्ट्र सध्या ‘सुरक्षित हातांत’ असून 2014 पासून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आधुनिकीकरणासाठी घेतलेले कष्ट संपूर्ण जगाला दिसत आहेत. मुंबईतील अटल सेतू आणि समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांमुळे दळणवळण सुलभ झाले असून, पुढच्या 5 वर्षांत महाराष्ट्राचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत महालक्ष्मीचा वास असून, फडणवीसांसारखा कर्मठ (कर्माला प्राधान्य देणारा) नेता मिळाल्याने राज्यासाठी पुढची दोन वर्षे अत्यंत सुंदर असतील, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे खूप कौतुक केले. ते म्हणाले, फडणवीसांची गोष्टच न्यारी आहे. मी त्यांची तुलना अटलजी आणि मोदीजींसोबत करतो.
मोठी भविष्यवाणी
2026 सालाबद्दल बोलताना पंडित शर्मा यांनी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते, 3 मार्च 2026 पासून देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीत शुक्राची महादशा सुरू होणार आहे, जी 2046 पर्यंत चालेल. या काळात त्यांच्या नशिबाचे तारे अधिक उजळतील. एप्रिल-मे 2026 पर्यंत त्यांची साडेसाती संपेल, त्यानंतर ते केवळ महाराष्ट्राचे नेतृत्वच करणार नाहीत, तर राष्ट्रीय राजकारणातही त्यांची उंची प्रचंड वाढेल.
पंडित शर्मा यांनी फडणवीसांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे. ज्याप्रमाणे 2002 मध्ये त्यांनी मोदींबद्दल भाकीत केले होते, तसेच आता ते फडणवीसांबद्दल करत आहेत. “देवेंद्र ते नरेंद्र” हा प्रवास फार लांब नाही, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, 2035-36 पर्यंत देवेंद्र फडणवीस या देशाचे पंतप्रधान बनू शकतात. त्यांच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती त्यांना देशाचे सर्वोच्च पद मिळवून देण्यासाठी अनुकूल आहे.
फडणवीसांना आरोग्याविषयी दिला सल्ला
शेवटी, पंडित शर्मा यांनी असेही सूचित केले की, 2046 पर्यंतची ग्रहदशा पाहता फडणवीसांना दोन ते तीन वेळा पंतप्रधान होण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 2026 हे वर्ष भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक सोनेरी काळ ठरेल, असा आशावाद त्यांनी या मुलाखतीतून व्यक्त केला आहे