सिंधुदुर्ग (आंगणेवाडी): कोकणातील सर्वात मोठी मानली जाणारी आंगणेवाडी येथील आई भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यात्रोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात असून अवघ्या दोन दिवसांवर हा सोहळा येऊन ठेपला आहे.
यंदा यात्रेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोकणासह राज्यातील अनेक राजकीय नेते, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि सेलिब्रिटी दरवर्षी देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात.
निकालाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा
यंदा 9 फेब्रुवारीलाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्याने सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून, गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी दिली आहे.
नऊ रांगांमधून सुलभ दर्शन
भाविकांना सुलभ आणि शिस्तबद्ध दर्शन मिळावे यासाठी मंदिर परिसरात नऊ स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या दिवशी लाखो भाविकांचा ओघ लक्षात घेऊन वाहतूक, पार्किंग आणि वैद्यकीय सुविधांचीही तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
हेही वाचा: Mumbai Mayor : भाजपच्या रितू तावडे यांची मुंबई महापौरपदी निवड
आकर्षक सजावट, भक्तांचा महासागर
मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली असून वातावरण भक्तिमय झाले आहे. दरवर्षी या यात्रेला सुमारे सहा ते सात लाख भाविक उपस्थित राहतात, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिभाव यांचे अद्वितीय दर्शन या यात्रेत घडते.
विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन
यात्रेला दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहत असल्याने यंदाही विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या असून, मुंबई, ठाणे, पुणे आणि कोकणातील विविध स्थानकांवरून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून गर्दीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त डबे जोडण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी प्रवासाचे आरक्षण आगाऊ करावे आणि वेळेचे नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेली ही यात्रा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक एकात्मतेचा उत्सव मानली जाते. आता यात्रेचा दिवस जवळ आल्याने संपूर्ण आंगणेवाडी गाव भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.
हेही वाचा: Zilla Parishad Election 2026: EVM मशीनमध्ये बिघाड; छत्रपती संभाजीनगरमधील दोन केंद्रावर उडाला गोंधळ