मुंबई: आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते पंढरपूरची वारी. हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. या एकादशीचे एक विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णू निद्रिस्त होतात अशी श्रद्धा आहे. तसेच या दिवशी व्रत केल्याने भक्तांची पापं नष्ट होतात. अनेकांना हा प्रश्न पडला असेल आषाढी एकादशी का साजरी केली जाते? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
पौराणिक कथेनुसार, भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन मृदुम्य नावाच्या राक्षसाला वरदान दिलं. तो फक्त एका स्त्रीच्या हातूनच मरेल, इतर कोणाच्याही हातून मरणार नाही. या वरामुळे मृदुम्य राक्षस खूपच उन्मत्त झाला. या आविर्भावात त्याने देवतांवर आक्रमण करण्यास सुरुवात केली. मृदुम्य राक्षसाने उच्छाद मांडल्यामुळे अन्य देवतांनी भगवान शंकराकडे मदतीसाठी धाव घेतली. मात्र मृदुम्य राक्षसाला वर दिल्याने भगवान शंकरांना काहीही करता येत नव्हतं. तेव्हा भगवान शंकरांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाचे वध केले. तसेच, राक्षस मरेपर्यंत सर्व देवता गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांचा उपवास झाला. या देवीचे नाव एकादशी होते आणि त्यामुळेच एकादशीला उपवास करण्याची प्रथा सुरू झाली. पौराणिक कथेनुसार, जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह एकादशी देवीची मनोभावे पूजा करते, त्यांना पापातून मुक्तता मिळते.
पंढरपूरचा विठोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आषाढी एकदशीला पंढरपुरात वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. या दिवशी महाराष्ट्रासह, विविध राज्यातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. यालाच आषाढी वारी म्हणतात. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्यामागे विशेष महत्त्व आहे. सुमारे आठ वर्षांहून अधिक काळापासून वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येतात.
(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)