Adhik Maas Jodavi Significance : हिंदू संस्कृतीत नात्यांना खूप महत्त्व दिले जाते आणि अनेक सण तसेच महिने हे नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे काम करतात. असाच एक महत्त्वाचा महिना म्हणजे अधिकमास, ज्याला 'धोंड्याचा महिना' असेही म्हणतात. हा महिना सासरे आणि जावई यांच्यातील नात्याचा धागा जपतो. मुलीचा पती नारायणाचे स्वरूप मानला जातो. अधिकमास हा श्री विष्णूच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आई-वडील घरी बोलावून आदराने वाण देतात. यामुळेच या महिन्यात जावयाला विशेष महत्त्व देण्याची प्रथा आहे. हा अधिकमास 'पुरुषोत्तम मास' म्हणून ओळखला जातो. कारण पुरुषोत्तम म्हणजे नारायण. लग्नसमारंभातही जावयाला नारायण मानले जाते आणि त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांसाठी जावई हा प्रत्यक्ष नारायणच असतो.
जोडवी आणि त्यांचे शास्त्रीय महत्त्व
जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा एक ऊर्जा वाहक धातू आहे. जेव्हा चांदी जमिनीला टेकते, तेव्हा जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते. यामुळे पायातील जोडवी शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात. नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी, आणि हा एक महत्त्वाचा सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनमध्येही जोडवी खूप लोकप्रिय झाली आहेत. जोडवी अंगठ्याजवळील बोटात घालण्यामागे एक शास्त्रीय कारण आहे.
अंगठ्याशेजारील बोटांमधली नस आणि स्त्रीचे गर्भाशय यांचा थेट संबंध असतो म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी ही ॲक्युप्रेशरचे काम करतात.अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी या मुळेच म्हणून जोडवी बदलतात.
हेही वाचा – Adhik Maas 2026: यंदा अधिक मास! आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी; जाणून घ्या दानधर्म, मुहूर्त आणि महत्त्व
या महिन्यात महिला जोडवी बदलतात?
यामागे काही विशिष्ट कारणे आहेत. वैवाहिक जीवनात सौभाग्य अलंकारांना खूप महत्त्व आहे. जोडवी ही सोळा शृंगारांपैकी एक आहे. तसेच, ती जोडीमध्ये असते. मुलगी आणि जावई यांचा जोडा हा लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला जातो. त्यांची जोडी अखंड रहावी, यासाठी अधिक मासामध्ये प्रतिकात्मकरीत्या आई मुलीला जोडवी भेट देते. याशिवाय, प्रत्येक स्त्री दर तीन वर्षांनी जोडवीत भर घालून (अधिक वाढवून) ती नवी जोडवी वापरू लागते. ही बाब अधिक मासात करण्याची पद्धत आहे. जोडवी ही पती-पत्नीचे नाते जोडून ठेवणारी मानली जाते.
अधिकमासाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व
अधिकमास हा अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात विशेष पूजाअर्चा आणि धार्मिक विधी केले जातात, ज्यामुळे आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. सामाजिक दृष्ट्या, हा महिना कुटुंबातील नातेसंबंध वृद्धिंगत करण्याची, विशेषतः सासर आणि माहेरकडील नाती अधिक घट्ट करण्याची संधी देतो. जावयाला केलेला मान-सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, दोन कुटुंबांमधील प्रेमाचे प्रतीक आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. )