अहमदाबाद, २८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : विल जॅक्स आणि विराट कोहली यांच्या तुफानी खेळींच्या जोरावर आरसीबीने गुजरात टायटन्सवर ९ विकेट्स आणि तब्बल २५ चेंडू राखून मोठा विजय साकारला. गुजरातच्या संघाने आरसीबीपुढे विजयासाठी २०१ धावांचे आव्हान ठेवले होते. विराट कोहलीने सुरुवातीला दमदार फलंदाजी करत विजयाचा पाया रचला आणि त्यावर विलने कळस चढवला. विलने यावेळी ४१ चेंडूंत पाच चौकार आणि १० षटकारांच्या जोरावर नाबाद १०० धावांची वादळी खेळी साकारली. विराट कोहलीने नाबाद ७० धावा करत जॅकला चांगली साथ दिली.
गुजराच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीची संघ मैदानात उतरला आणि विराट कोहलीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. विराट आक्रमक खेळत आहे, असे वाटत होते. पण जेव्हा जॅक्स फलंदाजीला आला तेव्हा विराटची खेळी पुन्हा एकदा संथ वाटायला लागली. कारण जॅक्सने टी-२० स्टाईलमध्ये धमाकेदार फटकेबाजी केली.
आरसीबीने टॉस जिंकला आणि गुजरातच्या संघाला पहिल्याच षटकात धक्का दिला. आरसीबीच्या स्वप्निल सिंगने वृद्धिमान साहाला ५ धावांवर बाद केले. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या साई सुदर्शनने गुजरातच्या संघाला चांगली धावगती मिळवून दिली. त्यामुळे पहिल्या पॉवर प्लेमध्ये गुजरातची १ बाद ४२ अशी स्थिती होती. त्यानंतर शुभमन गिल यावेळी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही. कारण ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद केले. गिलला यावेळी १६ धावा करता आल्या. गिल बाद झाला आणि त्यानंतर साई आणि शाहरुख खान यांची चांगलीच जोडी जमल्याचे पाहायला मिळाले.