हिटमॅन हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. रोहित शर्माने आपल्या झंझावाती खेळीने पुन्हा एकदा गोलंदाजांचा घाम गाळला आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात येत असलेल्या मुंबई विरुद्ध सिक्कीम या सामन्यात रोहित शर्माने आपला द हिटमॅन शो दाखवला आहे. तब्बल सात वर्षांनंतर रोहितने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दणक्यात कमबॅक केल आहे. आठ षटकार आणि आठ चौकारांच्या खेळीसह रोहित शर्माने सिक्कीमच्या गोलंदाजांविरोधात त्याची बॅट तापवली. सिक्कीमने मुंबईसमोर 237 धावांचं आव्हान ठेवलं.
प्रत्युत्तरात रोहितने अवघ्या 27 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं, त्यानंतर 62 चेंडूत शतक ठोकले. रोहितने या स्टेडियममध्ये विजयी धावांचा पाठलाग करताना ही खेळी साकारली आहे. रोहितने सुरुवातीपासूनच स्फोटक खेळी दाखवली. तर त्याला साथ देताना अंगक्रिषने सातत्याने एकेरी धावा घेत डाव वेगाने पुढे नेला. या दोघांनी 118 बॉलमध्ये 141 रन्सची पार्टनरशीप केली. अंगक्रिषने 58 बॉलमध्ये 38 रन्स केल्या. यावेळी रोहितने 162 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रोहितच्या लिस्ट ए क्रिकेटमधील 37 वं शतक ठरलं. दरम्यान हा सामना पाहण्यासाठी 12 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या गर्दीने स्टेडियम कचाकच भरले होते.
विजय हजारे ट्रॉफीतील रोहितची ही खेळी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत न्यूझीलंडचं टेन्शन वाढवणारी ठरली आहे. येत्या 2026 या नववर्षात टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. विजय हजारे ट्रॉफीतील रोहितची कामगिरी पाहता रोहितच्या चाहत्यांना त्याच्याकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे रोहितसाठीही ही संधी महत्त्वाची आहे.