BCCI Naman Awards 2026: आज दिल्लीत रंगणार क्रिकेट ताऱ्यांचा मेळा; कुठे, कधी आणि कसं पाहायचं ‘नमन’ पुरस्कारांचं लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

गेल्या काही वर्षांत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे, त्याचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे.

BCCI Naman Awards 2026: आज दिल्लीत रंगणार क्रिकेट ताऱ्यांचा मेळा; कुठे, कधी आणि कसं पाहायचं ‘नमन’ पुरस्कारांचं लाईव्ह स्ट्रीमिंग? जाणून घ्या

BCCI Naman Awards 2026: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आज, 15 मार्च रोजी दिल्ली येथे वार्षिक ‘नमन पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करत आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे, त्याचा गौरव या सोहळ्यात केला जाणार आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरणारा ‘टीम इंडिया’चा संपूर्ण संघ या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या सोहळ्यात केवळ वरिष्ठ खेळाडूच नव्हे, तर विविध वयोगटांतील उदयोन्मुख खेळाडूंच्या परिश्रमाचेही कौतुक केले जाईल.

राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज यांचा ‘जीवनगौरव’ सन्मान
या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये सर्वात मानाचा ‘सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार’ महान फलंदाज आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि महिला क्रिकेटची ओळख असलेल्या मिताली राज यांचाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मान केला जाईल. वर्तमान पिढीतील खेळाडूंमध्ये, स्टार फलंदाज शुभमन गिल याला 2024-25 वर्षासाठीचा ‘पॉली उम्रीगर’ म्हणजेच ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष)’ पुरस्कार दिला जाणार आहे, तर महिलांमध्ये स्मृती मानधना हिला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून गौरविण्यात येईल.

पाच विजेत्या कर्णधारांचा विशेष गौरव
बीसीसीआय यंदा एका खास सन्मानाची तयारी करत आहे. गेल्या वर्षभरात आयसीसी (ICC) च्या विविध स्पर्धांमध्ये भारताला जेतेपद मिळवून देणाऱ्या 5 कर्णधारांचा सत्कार केला जाणार आहे. यामध्ये 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2026 चा टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या कर्णधारांसह, महिला एकदिवसीय विश्वचषक विजेती कर्णधार आणि 19-वर्षांखालील (Under-19) पुरुष व महिला विश्वचषक विजेत्या कर्णधारांचा समावेश असेल. हर्षित राणा (पुरुष) आणि श्री चरण (महिला) यांना ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण’ पुरस्काराने गौरवण्यात येईल.

कधी, कुठे आणि कसे पाहाल थेट प्रक्षेपण?
क्रिकेट चाहत्यांसाठी हा सोहळा घरबसल्या पाहण्याची सुवर्णसंधी आहे. ‘नमन पुरस्कार’ सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आज संध्याकाळी 6:45 वाजल्यापासून (IST) सुरू होईल. टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) च्या माध्यमातून तुम्ही हा सोहळा पाहू शकता. मोबाईल किंवा स्मार्ट टीव्हीवर ‘Jio Hotstar’ ॲपवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल. 

BCCI नमन पुरस्कारांमधील प्रमुख विजेते
या दिमाखदार सोहळ्यात भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च ‘सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार’ राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज यांना प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या बॅटने छाप पाडणाऱ्या शुभमन गिलला ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष)’ तर स्मृती मानधनाला ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला)’ म्हणून सन्मानित करण्यात आले. नवोदित खेळाडूंमध्ये हर्षित राणा आणि श्री चरण यांनी आपापल्या श्रेणीत ‘सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण’ हा पुरस्कार पटकावला.

हेही वाचा – Kuldeep Yadav – Vanshika Got Married : मसुरीत कुलदीप यादव आणि वंशिकाचा शाही विवाह सोहळा संपन्न; दिग्गज खेळाडूंची उपस्थिती

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला ‘सर्वोत्तम कामगिरी’चा पुरस्कार मिळाला. रणजी करंडक (एलिट गट) स्पर्धेत विदर्भाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले असून, यश राठोडला सर्वाधिक धावांचा तर हर्ष दुबेला सर्वाधिक बळी घेण्याचा मान मिळाला. तसेच, 23-वर्षांखालील (U23) सी.के. नायडू करंडक स्पर्धेत महाराष्ट्राच्या विकी ओस्तवालने सर्वाधिक बळी घेऊन आपली छाप पाडली. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number