Pro Wrestling League 2026: यंदा प्रो रेसलिंग लीग (PWL) पुन्हा एकदा दमदार पुनरागमन करत आहे. या स्पर्धेसाठी चाहत्यांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांच्यात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी लीगची धमाकेदार सुरुवात होणार असून, 1 फेब्रुवारी 2026 रोजी नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये भव्य अंतिम सामना खेळला जाणार आहे. लीगच्या संपूर्ण कालावधीसाठी हे स्टेडियम आधीच पूर्णपणे बुक झाल्याचे आयोजकांनी जाहीर केले आहे.
फ्रँचायझींसाठी तुफान स्पर्धा
काही आठवड्यांतच PWL फ्रँचायझी मिळवणे भारतीय क्रीडा जगतातील सर्वात स्पर्धात्मक क्षेत्रांपैकी एक बनले आहे. अग्रगण्य कॉर्पोरेट समूह, व्यावसायिक घराणी आणि क्रीडा गुंतवणूकदार यात उतरले असून, लीगची वेगाने वाढणारी लोकप्रियता पाहता पुढील 30 दिवसांत सर्व फ्रँचायझी विकल्या जाण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे. भारतातील फार कमी क्रीडा लीगना हा वेगवान टप्पा गाठता आला आहे.
हेही वाचा – India vs South Africa 3rd ODI: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज अंतिम लढत! कोहली-रोहित नवे विक्रम गाठणार?
300 पेक्षा जास्त कुस्तीपटूंची नोंदणी
गुंतवणूकदारांसोबतच खेळाडू समुदायाकडूनही अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. येत्या खेळाडू लिलावासाठी 300 पेक्षा अधिक व्यावसायिक कुस्तीपटूंनी नोंदणी केली असून, ते 20 हून अधिक देशांमधून सहभागी होत आहेत. या यादीत ऑलिंपिक पदक विजेते, वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनालिस्ट तसेच भारतातील आघाडीचे पुरुष व महिला कुस्तीपटूंचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने आणि उच्च क्षमतेच्या खेळाडूंनी नोंदणी केल्याने PWL जगातील सर्वात विश्वासार्ह आणि उच्च-मूल्य क्रीडा प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून स्वीकारला जात असल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, या सीझनसाठीचा खेळाडू रोस्टर आंतरराष्ट्रीय दिग्गज आणि भारतीय उभरत्या प्रतिभांना एकत्र आणणार आहे. त्यामुळे PWL हा वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक पाहिला जाणारा क्रीडा कार्यक्रम ठरण्याची तयारी आहे. लीगकडून लवकरच संघांची अधिकृत घोषणा, ट्रॉफी लाँच, खेळाडू लिलावाच्या तारखा, चाहत्यांसाठी विशेष कार्यक्रम यासह अनेक मोठे अपडेट्स जाहीर होणार आहेत.