Aaryavir Sehwag: भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा 18 वर्षांचा मुलगा आर्यवीर सेहवाग याच्यावर क्रिकेट कारकिर्दीतील एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी प्रतिष्ठित ‘विनू मंकड ट्रॉफी’ स्पर्धेसाठी दिल्लीच्या 19-वर्षांखालील (Under-19) क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी आर्यवीरची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने (DDCA) या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी 16 सदस्यांच्या दिल्ली संघाची अधिकृत घोषणा केली आहे. ही स्पर्धा 8 ऑक्टोबरपासून विशाखापट्टणम येथे खेळवली जाणार आहे.
आर्यवीरने नुकतेच भारत 19-वर्षांखालील (Under-19) राष्ट्रीय संघातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. गेल्या महिन्यात राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय (ODI) मालिकेत तो भारतीय संघाचा महत्त्वाचा घटक होता. पहिल्या सामन्यात त्याने 26 चेंडूंत 28 धावा करत भारताला 7 धावांनी विजय मिळवून देण्यात मदत केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने संयमी फलंदाजी करत 47 धावांची खेळी केली; मात्र दुर्दैवाने तो धावबाद (Run Out) झाल्याने त्याचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले. तिसऱ्या सामन्यात 34 धावा करत त्याने या तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 109 धावा फटकावल्या.
कनिष्ठ स्तरावरील कामगिरी आणि DPL चा अनुभव
कनिष्ठ स्तरावर खेळताना आर्यवीरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. 2024 मध्ये मेघालयाविरुद्ध दिल्लीकडून खेळताना त्याने एकाच सामन्यात 297 धावांची वादळी खेळी केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याला ‘दिल्ली प्रीमियर लीग’ (DPL) 2026 मध्ये ‘वेस्ट दिल्ली लायन्स’ संघाकडून 2 सामने खेळण्याची संधी मिळाली होती, जिथे त्याने 24 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करण्याचे कौशल्य शिकल्याचे आर्यवीरने मान्य केले आहे.
अर्णव बुग्गा उपकर्णधार; दिल्ली संघाची विजयासाठी सज्जता
दिल्लीच्या या 16 सदस्यांच्या संघात अर्णव बुग्गाची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत राष्ट्रीय संघातील अनुभवाचा फायदा घेत दिल्लीला विजेतेपद मिळवून देण्याचे उद्दिष्ट कर्णधार आर्यवीरचे असेल.
हेही वाचा – के. एल. राहुलचे वादळी शतक अन् रोहित-ऋतुराजची फटकेबाजी; भारताचे वेस्ट इंडिजसमोर 352 धावांचे लक्ष्य
‘विनू मंकड ट्रॉफी’साठी घोषित केलेला दिल्ली संघ:
कर्णधार व उपकर्णधार: आर्यवीर सेहवाग (कर्णधार), अर्णव बुग्गा (उपकर्णधार).
प्रमुख फलंदाज व अष्टपैलू: तन्मय चौधरी, धन्य नक्रा, उदय चावला, गर्व कुमार, आर्यन शर्मा, ओजसदीप सिंग, किरित कौशिक, वरुण वंजानी, रुद्र देव यादव, प्रद्युम्न सनन, पार्थ राज, शांतनु यादव.
यष्टिरक्षक: अभिराज गगन सिंग, तरुण सिंग.