Shahid Afridi On ICC : टी-20 विश्वचषक 2026 मधून बांगलादेश संघाची हकालपट्टी केल्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आयसीसीने (ICC) घेतलेल्या या कठोर निर्णयामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी चांगलाच संतापला असून त्याने पुन्हा एकदा भारताचे नाव ओढत वादग्रस्त विधान केले आहे. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढणे हा आयसीसीचा पक्षपातीपणा असल्याचे म्हणत आफ्रिदीने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षेचे कारण देत नकार दिला होता. बांगलादेशने आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली. त्यानंतर शनिवारी 24 जानेवारी रोजी आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाद करून त्यांच्या जागी स्कॉटलँड संघाचा समावेश केला.
हेही वाचा - T20 World Cup 2026: पाकिस्तानने पत्करली शरणागती; आयसीसीच्या दणक्यानंतर शिस्तीत वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर
आफ्रिदीचा अजब तर्क आणि भारताशी तुलना
आफ्रिदीने आपल्या पोस्टमध्ये 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा संदर्भ दिला. तो म्हणाला, "जेव्हा भारताने सुरक्षेचे कारण देत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येण्यास नकार दिला, तेव्हा आयसीसीने त्यांची भूमिका मान्य केली. मात्र, आता बांगलादेशने तशीच मागणी केली असता त्यांना स्पर्धेतूनच काढून टाकण्यात आले. आयसीसीचा पाया हा निष्पक्षतेवर आधारित असायला हवा, पण इथे बांगलादेशी खेळाडू आणि चाहत्यांवर अन्याय झाला आहे."
सत्याचा विसर आणि नेटकऱ्यांचा संताप
आफ्रिदीने आयसीसीवर टीका करताना एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, ते म्हणजे आयसीसी आणि बीसीसीआयने बांगलादेशी खेळाडू, चाहते आणि पत्रकारांना संपूर्ण सुरक्षेचे लेखी आश्वासन दिले होते. केवळ कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) मुस्तफिजूर रहमानला संघातून बाहेर काढल्याच्या रागातून बांगलादेशने सुरक्षेचा बनाव रचल्याची चर्चा आहे. आफ्रिदीच्या या 'दुट्टप्पी' भूमिकेमुळे भारतीय नेटकऱ्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरले आहे.