अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का! रणजी ट्रॉफी 2026-27 साठी गोव्याच्या संघातून बाहेर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

अर्जुन तेंडुलकर याला मोठा धक्का बसला आहे. आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या 2026-27 या हंगामासाठी गोव्याच्या संघातून अर्जुनला वगळण्यात आले आहे.

अर्जुन तेंडुलकरला मोठा धक्का! रणजी ट्रॉफी 2026-27 साठी गोव्याच्या संघातून बाहेर; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
Arjun Tendulkar excluded Goa Ranji squad

भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचे चिरंजीव आणि अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकर याला मोठा धक्का बसला आहे. आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेच्या 2026-27 या हंगामासाठी गोव्याच्या संघातून अर्जुनला वगळण्यात आले आहे. रणजी करंडकाचा नवा हंगाम 11 ऑक्टोबरपासून सुरू होत असून, ‘एलिट ग्रुप ए’ मधील आपल्या पहिल्या सामन्यात गोवा संघ बडोद्याविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हा सामना गोव्यातील भाऊसाहेब बांदोडकर स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आलेल्या गोव्याच्या 16 सदस्यीय अंतिम संघात अर्जुन तेंडुलकरला स्थान मिळवण्यात अपयश आले.

पदार्पणात झळकावले होते शानदार शतक

अर्जुन तेंडुलकरने 2022 मध्ये मुंबई सोडून गोव्याच्या संघात प्रवेश केला होता आणि आपल्या पहिल्याच रणजी सामन्यात शानदार शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे, त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांनीही 1987 मध्ये वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी मुंबईकडून पदार्पण करताना शतक झळकावले होते. या नव्या हंगामात अभिनव तेजराणा गोव्याचे नेतृत्व करणार आहे. तसेच, यापूर्वी दिल्लीकडून खेळलेला ललित यादव आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळलेला सुयश प्रभुदेसाई यांचाही गोव्याच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

मागील हंगामात केली होती अष्टपैलू कामगिरी

27 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने गोव्याकडून आपला शेवटचा रणजी सामना 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 दरम्यान पोर्वोरिम येथे केरळविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात त्याने पहिल्या डावात 36 आणि दुसऱ्या डावात 24 धावा केल्या होत्या, तसेच पहिल्या डावात 28 षटकांत 109 धावा देऊन 2 बळी टिपले होते.

हेही वाचा – सूर्यांश शेडगेची फटकेबाजी अन् गुरजपनीतची भेदक गोलंदाजी; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 49 धावांनी पराभव

रणजी ट्रॉफीच्या 2025-26 या संपूर्ण हंगामात अर्जुनने गोव्यासाठी ‘एलिट ग्रुप बी’ मधील सर्व 7 सामने खेळले होते. त्या हंगामातील 10 डावांमध्ये त्याने 153 धावा केल्या होत्या आणि 15 फलंदाज बाद केले होते. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अर्जुनने आतापर्यंत एकूण 24 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर 685 धावा आणि 52 बळींची नोंद आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांसह 25 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे. मात्र, तरीही आगामी मोसमाच्या सुरुवातीलाच त्याला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number