Tuesday, March 10, 2026 11:29:45 AM

Asia Cup Trophy Controversy: भारत विजेता ठरला तरी ट्रॉफी वितरणात विलंब, पाकिस्तानचा घाणेरडा डाव समोर

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.

asia cup trophy controversy भारत विजेता ठरला तरी ट्रॉफी वितरणात विलंब पाकिस्तानचा घाणेरडा डाव समोर

Asia Cup Trophy Controversy: आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. सामना जिंकल्यानंतर प्रत्येक भारतीय चाहत्याला तो क्षण पाहायचा होता. जिथे भारतीय संघ विजयाची ट्रॉफी उंचावेल. मात्र हा क्षण एक तास उशिरा आला आणि त्यामागचं कारण थेट पाकिस्तानच्या राजकारणाशी जोडलेलं असल्याचं स्पष्ट झालं.

सामना संपल्यानंतर खेळाडूंच्या मुलाखती झाल्या, मैदानावर उत्सवाचे वातावरण होते, पण ट्रॉफी वितरणाचा सोहळा मात्र होत नव्हता. भारतीय संघ, चाहत्यांपासून ते क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वांनाच प्रश्न पडला होता की ट्रॉफी देण्यात विलंब का होतोय? यामागे समोर आलं पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख मोहसिन नक्वी यांचं नाव.

हेही वाचा: India Won Asia Cup 2025 : युद्धाच्या मैदानातच नव्हे तर खेळाच्या मैदानातही भारताने पाकिस्तानला नमवलं! 9 व्यांदा जिंकला आशिया कप

मोहसिन नक्वी हे भारताविरोधात सतत कठोर वक्तव्यं करणारे म्हणून ओळखले जातात. अंतिम सामन्यानंतर ट्रॉफी त्यांच्या हातूनच द्यायची होती, पण भारतीय संघाने नक्वी यांच्या हातून करंडक घेण्यास नकार दिला. भारताची ही ठाम भूमिका लक्षवेधी ठरली. मात्र नक्वी यांनी देखील आपला हट्ट सोडला नाही. परिणामी, एक तासभर विजेतेपद मिळवूनही भारतीय खेळाडू ट्रॉफीपासून वंचित राहिले.

या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी आधीच्या सामन्यांमध्ये दिसली होती. साखळी सामन्यात सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हस्तांदोलन टाळलं होतं. त्यावेळी पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडे सूर्यावर तक्रार केली होती. नक्वी यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली होती आणि सूर्यकुमारला कठोर शिक्षा व्हावी यासाठी दबाव टाकला होता. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करतानाही त्यांनी सूर्यावर राजकीय रंग चढवण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा:IND vs PAK Final: तिलक वर्माचं अर्धशतक! टीम इंडियाची विजयाच्या दिशेने वाटचाल

 

अंतिम सामन्यापूर्वी करंडक अनावरण सोहळ्यात सूर्यकुमारने नक्वी आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांच्याशी हस्तांदोलन केले होते. त्यावेळी त्याच्यावर टीका झाली होती की त्याने आपली भूमिका स्पष्ट ठेवली नाही. पण अंतिम सामन्यानंतर भारतीय संघाने ठाम भूमिका घेत नक्वी यांच्या हातून करंडक स्वीकारण्यास नकार दिला.

या संपूर्ण वादामुळे आशिया कपचा विजयोत्सव एक तास उशिरा झाला. चाहत्यांच्या भावनांना धक्का बसला असला तरी भारताने पाकिस्तानविरुद्ध मैदानात केलेली कामगिरी लक्षवेधी राहिली. मात्र ट्रॉफी वितरणाच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात राजकारणाचे सावट असल्याचं स्पष्ट झालं.

पाकिस्तानने सतत राजकीय मुद्द्यांना क्रीडा क्षेत्राशी जोडण्याची परंपरा कायम ठेवली आहे. ACC च्या अध्यक्षपदी असलेला व्यक्ती जर एका देशाविरुद्ध सतत पूर्वग्रहदूषित वर्तन करत असेल, तर क्रिकेटसारख्या खेळाच्या जागतिक प्रतिमेला धक्का बसतो. भारतीय संघाने दाखवलेली ठाम भूमिका हा केवळ खेळाडूंचा सन्मान नाही, तर देशाच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे.

शेवटी, भारताने मैदानावर आपली ताकद दाखवून आशिया कप 2025 जिंकला आणि चाहत्यांना आनंद दिला. मात्र ट्रॉफी वितरणातील या वादामुळे स्पर्धेच्या आठवणींवर एक वादळी ठसा उमटला आहे. आता ACC आणि ICC यांच्याकडून पुढे काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


सम्बन्धित सामग्री