नाशिकच्या सर्वेश कुशारे याने उंच उडीमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचला आहे.पुरुषांच्या उंच उडीत सर्वेशने ऐतिहासिक कामगिरी केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये 2.25 मीटर उंच उडीसह रौप्यपदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला होता, आता आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.
भारतीय सैन्यात तो नायब सुभेदार या पदावर कार्यरत आहे. सर्वेशचा जन्म नाशिक जिल्ह्यातील देवरगाव येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील शेतकरी आहेत. सुरुवातीच्या काळात सरावासाठी आवश्यक फोम मॅट्स (Foam Mats) नसल्यामुळे दुखापत होऊ नये म्हणून त्याच्या वडिलांनी शेतातील मक्याची कणसं, कचरा आणि कापूस एकत्र करून गादी तयार केली होती, ज्यावर सर्वेश लँडिंगचा सराव करायचा.
2016 मध्ये क्रीडा कोट्यातून सर्वेश भारतीय सैन्यातील 101 फील्ड रेजिमेंटमध्ये रुजू झाला. या संधीमुळे त्याच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली. त्यानंतर क्रीडा क्षेत्रात दमदार कमबॅक करत सर्वेशने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे