Commonwealth Games 2026: त्रिपुरातील एका अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातून आलेल्या अस्मिता डे हिने आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दक्षिण त्रिपुरातील बेलोनिआ या लहानशा शहरातील एका सायकल दुरुस्तीचे काम करणाऱ्या बापाची ही लेक आज देशभरासाठी अभिमान ठरली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) महिलांच्या 48 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठत अस्मिताने ज्युडो क्रीडा प्रकारात भारतासाठी पदक पक्के केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि आर्थिक अडचणींवर मात करत तिने रचलेला हा इतिहास आज लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
6 मिनिटांचा थरार आणि स्कॉटलंडच्या चॅम्पियनवर मात
उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-Final) अस्मिताचा सामना स्कॉटलंडची अनुभवी आणि 4 वेळा ब्रिटिश चॅम्पियन राहिलेल्या सुमर शॉ हिच्याशी झाला. तब्बल 6 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात अस्मिताने अप्रतिम संयम, बचावात्मक कौशल्य आणि तांत्रिक हुशारी दाखवली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत राहिल्याने आणि सामना संपण्यास 1 मिनिट 25 सेंकंद शिल्लक असताना अस्मिताला 1 शिडो बसल्यानंतरही तिने आपले धैर्य खचू दिले नाही. अखेर सामना 'गोल्डन स्कोअर' (Golden Score) च्या टप्प्यात गेला.
'गोल्डन स्कोअर'मध्ये निर्णायक डाव आणि ऐतिहासिक विजय
गोल्डन स्कोअरचा हा थरार तब्बल 2 मिनिटे 24 सेकंदांपर्यंत रंगला. या निर्णायक क्षणी अस्मिताने स्कॉटलंडच्या प्रतिस्पर्ध्यावर अत्यंत वेगवान आणि आक्रमक डाव साधत तिला मॅटवर पाडले. या अप्रतिम चालीच्या जोरावर तिने 1-0 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आणि भारताचे पदक निश्चित केले. आता तिच्यासमोर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
हेही वाचा – BCCI New Rule: वयाच्या फसवणुकीवर BCCI चा चाबूक! बनावट कागदपत्रे देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
धावपटू ते ज्युडो चॅम्पियन: भोपाळच्या 'साई' केंद्रातील खडतर प्रवास
अस्मिताचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीला ती एथलेटिक्समध्ये 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असे. परंतु, तिच्या प्रशिक्षकांनी तिच्यातील खरी ताकद ओळखून तिला ज्युडो खेळण्याचा मोलाचा सल्ला दिला. यानंतर कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर राहून तिने भोपाळ येथील 'साई' (SAI) क्रीडा केंद्रात व्यावसायिक प्रशिक्षण घेतले. गरिबीवर मात करत अस्मिताने मिळवलेले हे यश भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी सुवर्णक्षण ठरले आहे.