ICC T20 World Cup 2026: आगामी T20 विश्वचषक 2026 सुरू होण्यापूर्वी क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशला या स्पर्धेतून अधिकृतपणे वगळले असून त्यांच्या जागी स्कॉटलंड संघाचा समावेश केला आहे. सुरक्षा कारणास्तव भारतात प्रवास करण्यास बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) नकार दिल्यानंतर आयसीसीने हे कठोर पाऊल उचलले आहे.
जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
दरम्यान, आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बांगलादेशच्या सहभागाबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसीने बीसीबीला भारतात येण्याबाबत निर्णय घेण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत अधिकृत माहिती न मिळाल्याने आणि बांगलादेशने प्रोटोकॉलचे उल्लंघन करत परस्पर पत्रकार परिषद घेतल्याने आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेर करण्याचा निर्णय घेतला.
विवाद निवारण समितीकडूनही दिलासा नाही
आयसीसीच्या या निर्णयाविरोधात बांगलादेशने विवाद निवारण समितीकडे धाव घेतली होती. मात्र, प्रशासकीय मंडळाच्या निर्णयांत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे समितीने स्पष्ट केले. यामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. "सुरक्षेच्या कारणास्तव संघ भारतात प्रवास करणार नाही," ही बीसीबीची भूमिका या निर्णयाला कारणीभूत ठरली.
स्कॉटलंडचे विश्वचषकातील वेळापत्रक (गट C)
स्कॉटलंड आता बांगलादेशच्या निर्धारित वेळापत्रकानुसार खेळेल. त्यांचे सामने खालीलप्रमाणे असतील:
7 फेब्रुवारी: विरुद्ध वेस्ट इंडिज
9 फेब्रुवारी: विरुद्ध इटली
14 फेब्रुवारी: विरुद्ध इंग्लंड (कोलकाता)
17 फेब्रुवारी: विरुद्ध नेपाळ (मुंबई)
स्कॉटलंडलाच संधी का मिळाली?
स्पर्धा सुरू होण्यासाठी 15 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना स्कॉटलंडची निवड करणे आयसीसीसाठी सर्वात व्यावहारिक ठरले. पात्र न ठरलेल्या संघांमध्ये स्कॉटलंड आयसीसी T20I क्रमवारीत सर्वोच्च स्थानावर आहे. तसेच पूर्ण-सदस्य राष्ट्रांविरुद्ध स्कॉटलंडची अलीकडील कामगिरी अत्यंत चांगली राहिली आहे. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करता स्कॉटलंड त्वरित सहभागी होऊ शकतो.