नवी दिल्ली : आशिया कपच्या सुपर फोर फेरीतील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी केलेल्या वादग्रस्त हावभावांवरून बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात भारताने सामनाधिकारी अँडी पायकॉफ्ट यांच्याकडेही कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर बॅट बंदुकीसारखी धरून साजरे केले. या हावभावाला चिथावणीखोर आणि असंवेदनशील म्हटले जात असून, भारतीय संघ व्यवस्थापनाने याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा रंगली.
यानंतर वेगवान गोलंदाज हारिस रऊफच्याही वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्याने संजू सॅमसनला बाद केल्यानंतर आक्रमक प्रतिक्रिया दिली, तसेच सीमारेषेजवळ चाहत्यांच्या चेष्टेला प्रत्युत्तर म्हणून बोटांनी “0-6” अशी खूण दाखवली. या कृतीचा संदर्भ पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या त्या दाव्याशी जोडला गेला की, मे महिन्यातील सीमावादात त्यांनी भारतीय हवाई दलाची सहा विमानं पाडली होती.
रऊफचा हे हावभाव लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भारतीय चाहत्यांकडून त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. त्याच वेळी प्रेक्षकांनी “विराट कोहली”च्या आरोळ्यांनीही रऊफला लक्ष्य केले. कारण 2022 च्या टी20 विश्वचषकात मेलबर्नमध्ये कोहलीने त्याच्या गोलंदाजीवर दोन सलग षटकार ठोकले होते.
याआधी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या विधानांवर आक्षेप घेत आयसीसीकडे दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर सूर्यकुमारने विजय शहीद जवानांना अर्पण केल्याचे म्हटले होते. पीसीबीने त्याला राजकीय रंग दिला होता.