T20 World Cup: भारतीय खेळाडूंना कुटुंबापासून दूर राहावं लागणार! बीसीसीआयने टीम इंडियाची ‘ती’ मागणी फेटाळली

टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारतीय खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्यास बीसीसीआयने परवानगी नाकारली आहे.

T20 World Cup: भारतीय खेळाडूंना कुटुंबापासून दूर राहावं लागणार! बीसीसीआयने टीम इंडियाची ‘ती’ मागणी फेटाळली

T20 World Cup: टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने विजयी सुरुवात केली असून पहिल्याच सामन्यात युएसएवर मात केली आहे. या विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढला असला, तरी स्पर्धेदरम्यान खेळाडूंना एक मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. वर्ल्ड कपच्या कालावधीत कुटुंबीयांना सोबत ठेवण्याबाबत केलेली भारतीय संघ व्यवस्थापनाची मागणी बीसीसीआयने फेटाळून लावली आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंना कुटुंबापासून दूर राहावं लागणार आहे.

वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये मानसिक स्थैर्य महत्त्वाचं मानलं जातं. याच कारणामुळे काही खेळाडूंनी आणि टीम मॅनेजमेंटने कुटुंबीयांना सोबत ठेवण्याबाबत बोर्डाकडे स्पष्टता मागितली होती. मात्र बीसीसीआयने आपल्या आधीच्या धोरणावर ठाम राहत कोणतीही सवलत देण्यास नकार दिला आहे.

सध्याच्या नियमांनुसार, भारतीय संघाचा दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा असल्यास खेळाडूंना ठरावीक काळासाठी कुटुंबीयांना सोबत ठेवण्याची परवानगी दिली जाते. मात्र 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या दौऱ्यांमध्ये ही मुभा मर्यादित ठेवण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपचा कालावधी या नियमांत बसत नसल्यामुळे खेळाडूंना अधिकृत संघ योजनेत कुटुंबीयांना सामावून घेता येणार नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना त्यांच्या पत्नी किंवा पार्टनरसह प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र बोर्डाने हा प्रस्ताव मान्य न करता, खेळाडूंनी इच्छित असल्यास कुटुंबीयांनी स्वखर्चाने वेगळी व्यवस्था करावी, असं सांगितलं आहे. मात्र संघाच्या हॉटेल, प्रवास किंवा इतर अधिकृत योजनांमध्ये कुटुंबीयांचा समावेश केला जाणार नाही.

बीसीसीआयने हे धोरण ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर अधिक कडक केलं होतं. त्या मालिकेत झालेल्या अपयशानंतर बोर्डाने शिस्त आणि व्यावसायिकतेवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या 10 कलमी मार्गदर्शक तत्वांमध्ये खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि व्यवस्थापन सर्वांसाठी समान नियम लागू करण्यात आले.

या मार्गदर्शक तत्वांनुसार, 45 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या परदेश दौऱ्यांमध्ये खेळाडूंना जास्तीत जास्त एका आठवड्यासाठीच कुटुंबीयांना सोबत ठेवता येईल. टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा कालावधी लागू होत नसल्यामुळे बीसीसीआयने कोणतीही सवलत देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा पुढील सामना गुरुवारी नामिबियाविरुद्ध होणार असून संघ पूर्ण लक्ष खेळावर केंद्रित करण्याच्या तयारीत आहे. मात्र कुटुंबापासून दूर राहण्याचा निर्णय खेळाडूंवर मानसिक दबाव टाकू शकतो, अशी चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू आहे. बीसीसीआयचा हा निर्णय योग्य की कठोर, यावर वाद सुरू असला तरी सध्या खेळाडूंना नियम पाळण्याशिवाय पर्याय नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number