IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा; सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

फ्रँचायझीने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून नियुक्ती केली आहे.
IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा; सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती
Sourav Ganguly

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2027 च्या आगामी हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (DC) क्रीडा जगतात खळबळ उडवून देणारी मोठी घोषणा केली आहे. फ्रँचायझीने भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक (Head Coach) म्हणून नियुक्ती केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक विशेष व्हिडिओ शेअर करत या निर्णयाची माहिती दिली. “दिल्ली, आता वेळ आली आहे ‘दादागिरी’ची. सौरव गांगुली – ‘टायगर्स’चे मुख्य प्रशिक्षक,” असे कॅप्शन देत त्यांनी गांगुली यांचे स्वागत केले आहे.

हेमांग बदानी यांच्या जागी गांगुली यांच्याकडे सूत्रे

मागील हंगामात भारताचे माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत होते; आता त्यांच्या जागी सौरव गांगुली ही धुरा सांभाळतील. दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या इतिहासामध्ये अद्याप एकदाही विजेतेपद न मिळवू शकलेल्या मोजक्या संघांपैकी एक आहे. त्यामुळे सौरव गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला पहिलेवहिले आयपीएल विजेतेपद मिळवून देणे हे त्यांचे मुख्य ध्येय असेल. गांगुली यांच्यापूर्वी फ्रँचायझीने ग्रेग शिपरड, एरिक सायमन, गॅरी कर्स्टन, पॅडी अप्टन, रिकी पॉन्टिंग आणि हेमांग बदानी या 6 प्रशिक्षकांची सेवा घेतली आहे.

हेही वाचा – महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौरचा सर्व प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा; भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती

गांगुली यांचे दिल्ली फ्रँचायझीशी जुने नाते

सौरव गांगुली यांचा दिल्ली कॅपिटल्सशी प्रदीर्घ संबंध राहिला आहे. मार्च 2019 मध्ये त्यांची प्रथम दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. परंतु, ऑक्टोबर 2019 मध्ये बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बीसीसीआयमधील कार्यकाळ पूर्ण झाल्यावर गांगुली पुन्हा ‘क्रिकेट संचालक’ (Director of Cricket) म्हणून संघात परतले. या काळात त्यांनी आयपीएल (IPL) आणि डब्ल्यूपीएल (WPL) मधील दिल्लीच्या संघांसाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय SA20 लीगमधील ‘प्रिटोरिया कॅपिटल्स’चे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करताना त्यांनी 2025 मध्ये संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले होते.

संघाची कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान

गेल्या काही वर्षांत दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी खालावलेली पाहायला मिळाली आहे. आयपीएल 2022 पासून हा संघ एकदाही साखळी फेरीच्या (Group Stage) पुढे मजल मारू शकलेला नाही. संघाने शेवटच्या वेळी 2021 मध्ये प्ले-ऑफ गाठले होते, तर 2020 मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. या निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, गांगुली यांच्या अनुभवाचा फायदा घेत संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version