IND vs AUS : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस संमिश्र भावनांचा ठरला. टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील पुरुष संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवातून सावरत असतानाच, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघालाही पहिल्या एकदिवसीय सामन्यात कांगारूंनी पराभवाची धूळ चारली आहे.
महिला संघाची अडखळती सुरुवात
काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक टी-20 मालिका जिंकून नवा इतिहास रचणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या 'वूमन इन ब्लू'ला वन-डे फॉरमॅटमध्ये मात्र ती लय टिकवता आली नाही. मंगळवारी (24 फेब्रुवारी) झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू कामगिरी करत भारतावर 6 गडी राखून मात केली आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व
प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाची फलंदाजी सपशेल फ्लॉप ठरली. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा डाव 48.3 षटकांत 214 धावांवर आटोपला. 215 धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यांनी अवघ्या 38.2 षटकांत 4 गडी गमावून 217 धावा करत विजय मिळवला. तब्बल 70 चेंडू राखून मिळवलेला हा विजय ऑस्ट्रेलियाचा दबदबा सिद्ध करणारा ठरला.
हेही वाचा - Women's T20 World Cup 2026 Schedule: महिला टी-20 विश्वचषक 2026 चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी रंगणार भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना
पुरुष संघाचेही 'सुपर-8' मधील गणित बिघडले
दुसरीकडे, अहमदाबादमध्ये झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी धुव्वा उडवला. सलग पाच विजयांसह दक्षिण आफ्रिकेने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या पराभवामुळे टीम इंडियाच्या सेमीफायनलच्या प्रवासात आता अडथळे निर्माण झाले असून, पुढच्या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे.