IPL 2026: चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2026 च्या आधी मोठा ‘ब्लॉकबस्टर’ करार करत संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधले आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आता पिवळ्या जर्सीत दिसणार आहे. यासाठी CSK ने दोन मोठ्या स्टार्सची अदलाबदल केली. रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवण्यात आले आहे. या व्यवहारानंतर CSKच्या संघरचनेत मोठा बदल झाला असून चाहत्यांमध्येही आश्चर्य आणि उत्साह दोन्ही वातावरण आहे.
जडेजा आणि करन यांची अदलाबदल
सीएसकेने जडेजाला काही वर्षांपूर्वी 18 कोटींमध्ये विकत घेतले होते, पण आता या अदलाबदलीत राजस्थान त्याला 14 कोटी देणार आहे. यामुळे जडेजाच्या मूल्यात घट झाली आहे. इंग्लंडचा ऑलराउंडर सॅम करन देखील या मोठ्या ट्रेडचा भाग आहे. सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक केएस विश्वनाथन यांनी हा निर्णय “संघाच्या इतिहासातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक” असल्याचे सांगितले. जडेजा आणि करन दोघांचीही परस्पर संमती मिळाल्यानंतरच हा व्यवहार पूर्ण करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Jasprit Bumrah: बुमराहची ऐतिहासिक कामगिरी!; भागवत चंद्रशेखर यांच्या 'या' विक्रमाशी केली बरोबरी
जडेजाची CSK मधील कामगिरी अविस्मरणीय
रवींद्र जडेजाने 2012 पासून CSK साठी 150 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या, 2300 हून अधिक धावा केल्या आणि 2018, 2021 आणि 2023 मधील विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. जडेजा म्हणजे CSKचा कणा. परंतु, त्याची रवानगी चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे. तथापी, सॅम करननेही CSKसाठी महत्त्वाचे योगदान दिले. त्याने 28 सामने खेळून 356 धावा केल्या आणि 23 विकेट्स घेतल्या. तो 2021 च्या विजेत्या संघाचाही भाग होता.
हेही वाचा – IPL 2026 : असे पाच खेळाडू जे ठरले संघाचे कायमचे आधारस्तंभ!; फ्रँचायझींने कधीही केले नाही रिलीज
संजू सॅमसनची पिवळ्या जर्सीत धमाकेदार एन्ट्री
संजू सॅमसन जवळपास 4,500 हून अधिक धावा, एक दशकाहून अधिक अनुभव आणि दमदार नेतृत्वगुण घेऊन CSK मध्ये दाखल होत आहे. तो 2021 ते 2025 दरम्यान राजस्थानचा कर्णधार होता. त्याने 2022 मध्ये संघाला फायनलमध्ये नेले होते. CSK ला धोनीनंतर योग्य भारतीय बॅट्समन-विकेटकीपरची गरज होती आणि संजू सॅमसन त्यासाठी परफेक्ट पर्याय मानला जात आहे.