Sunil Gavaskar: आयपीएलच्या चालू हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ज्या खेळाडूसाठी आपली तिजोरी रिकामी केली, तोच आता संघासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन याच्या सुमार कामगिरीवर भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. "ज्याला नीट खेळता येत नाही, त्याला आधी संघातून बाहेर करा," अशा शब्दांत गावस्कर यांनी 'केकेआर' व्यवस्थापनाला सुनावले आहे.
25.20 कोटींचा खेळाडू अन् कामगिरी शून्य!
कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात कॅमेरून ग्रीनला तब्बल 25.20 कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील करून घेतले होते. मात्र, पहिल्या दोन सामन्यांत त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. मुंबईविरुद्ध अवघ्या 18 धावा आणि सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फक्त 2 धावा करणाऱ्या ग्रीनला अजून आपला सूर गवसलेला नाही. फलंदाजीतील अपयशासोबतच तो गोलंदाजीही करत नसल्याने गावस्कर यांचा पारा चढला आहे.
गोलंदाजीवर बंदी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने (CA) 'वर्कलोड मॅनेजमेंट' अंतर्गत ग्रीनला सुरुवातीच्या काही सामन्यांत गोलंदाजी न करण्याचा सल्ला दिला आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरत असल्याने तो किमान 10 ते 12 दिवस चेंडू हातात घेऊ शकणार नाही. याच मुद्द्यावरून गावस्कर यांनी संघ प्रशासनाला धारेवर धरले. "जर इतका महागडा खेळाडू केवळ फलंदाज म्हणून खेळणार असेल आणि त्यातही तो धावा करत नसेल, तर त्याचा संघाला काय फायदा? त्याऐवजी एखाद्या तरुण आणि फॉर्मात असलेल्या खेळाडूला संधी देऊन संघाची घसरलेली बाजू सावरा," असे परखड मत गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
कर्णधार रहाणेच्या अडचणीत वाढ?
सुनील गावस्कर यांनी यापूर्वी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि वसीम जाफर यांच्यावरही टीका केली होती. आता ग्रीनच्या फॉर्ममुळे केकेआरच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. जरी ग्रीन नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करताना दिसत असला, तरी प्रत्यक्ष सामन्यात तो कधी 'ऑलराउंड' कामगिरी करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत गावस्करांच्या या स्फोटक विधानाची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.