Harbhajan Singh Sreesanth Controversy: क्रिकेटविश्वात एकेकाळी गाजलेल्या ‘थप्पड कांड’ प्रकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात घडलेल्या या वादाला आता तब्बल 18 वर्षे उलटली असली, तरी भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याने नव्याने केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. हरभजन सिंगसोबतचे संबंध आता पूर्णपणे तुटल्याचे स्पष्ट करत श्रीसंतने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
‘थप्पड कांड’चा व्यावसायिक वापर?
श्रीसंतने एका मुलाखतीत सांगितले की, 2008 मधील त्या वादाचा वापर हरभजन सिंगने आर्थिक फायद्यासाठी केला. त्याच्या म्हणण्यानुसार, त्या घटनेवर आधारित एक जाहिरात तयार करण्यात आली होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले गेले. “या जाहिरातीमुळे 80 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले,” असा दावा श्रीसंतने केला आहे. इतकंच नव्हे, तर ही जाहिरात सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी हरभजनने स्वतः फोन करून विनंती केल्याचाही आरोप त्याने केला. मात्र, या गोष्टीमुळे तो प्रचंड नाराज झाल्याचे श्रीसंतने स्पष्ट केले.
हेही वाचा: Sachin Tendulkar Birthday Special Story | सचिन तेंडुलकरची फलंदाजीचं नव्हे तर गोलंदाजीही होती खास; या रेकॉर्डची कित्येक चाहत्यांना माहितीचं नाही, वाचा इनसाइड स्टोरी
‘माफ केलं, पण विसरणार नाही’
या प्रकरणावर बोलताना श्रीसंत म्हणाला की, त्याने हरभजनला माफ केले असले तरी ती घटना तो कधीही विसरू शकत नाही. “एखाद्याची चूक विसरली, तर ती पुन्हा घडते. हरभजन याचं उदाहरण आहे,” असे तो म्हणाला. यावेळी त्याने हरभजनच्या सार्वजनिक वक्तव्यांवरही टीका केली. विशेषतः, श्रीसंतच्या मुलीबद्दल हरभजनने दिलेल्या प्रतिक्रियेवर तो म्हणाला की, “ते सगळं केवळ दिखावा होता.”
सोशल मीडियावरही ‘ब्लॉक’
या वादाची तीव्रता इतकी वाढली आहे की, श्रीसंतने हरभजन सिंगला इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याची माहिती स्वतः दिली. त्यामुळे त्यांच्या नात्यातील दुरावा अधिक स्पष्ट झाला आहे. “मला आता त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही,” असेही त्याने स्पष्ट केले.
हेही वाचा: RCB Vs GT IPL 2026: विराट-पडिक्कलच्या भागीदारीसमोर साई सुदर्शनचं शतक पडलं फिकं, RCB कडून गुजरातचा पराभव
पहिल्यांदाच उघडपणे वक्तव्य
श्रीसंतने सांगितले की, यापूर्वी त्याने कधीही या विषयावर सार्वजनिकपणे भाष्य केले नव्हते. मात्र, आता योग्य वेळ आल्यामुळेच तो बोलत असल्याचे त्याने नमूद केले. “माझ्या आई-वडिलांनी मला माफ करायला शिकवलं, पण विसरू नये हेही शिकवलं,” असे तो म्हणाला.
वाद पुन्हा पेटण्याची शक्यता
या नव्या आरोपांमुळे जुना वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. क्रिकेटप्रेमींमध्ये या प्रकरणाची चर्चा पुन्हा जोर धरू लागली असून, हरभजन सिंग यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.