National Shooting Championship: गाझियाबादच्या आशिष राणाने "जिद्द असेल तर परिस्थितीवर मात करता येते," हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या 68 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आशिषने 50 मीटर आयएसएसएफ वरिष्ठ पुरुष गटात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, स्वतःचे पिस्तूल विकत घेण्याची आर्थिक क्षमता नसतानाही त्याने मित्राकडून शस्त्र उधार घेऊन हे ऐतिहासिक यश संपादन केले आहे. दरम्यान, 24 वर्षीय आशिष हा एका शेतकरी कुटुंबातील तरुण असून, त्याच्याकडे 25 मीटर नेमबाजीसाठी स्वतःचे पिस्तूल होते, परंतु 50 मीटर गटात खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. अशा वेळी खचून न जाता त्याने मित्राचे पिस्तूल मागून घेतले आणि एकलव्य शूटिंग अकादमीमध्ये कठोर सराव केला. दिल्लीतील डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने 600 पैकी 551 गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले.
हेही वाचा – T20 World Cup आधी टीम इंडियाला मोठा धक्का; नाश्ता केला अन् अचानक…; राजकोटमध्ये नेमकं काय घडलं?
आशिष सोबतच एकलव्य शूटिंग अकादमीच्या इतर खेळाडूंनीही या स्पर्धेत मोठी झेप घेतली आहे. अक्षा चौधरीने 10 मीटर एअर पिस्तूल गटात भारतीय संघ चाचण्यांसाठी पात्रता मिळवली, तर शुभम बालियान देखील 10 मीटर एअर पिस्तूल वरिष्ठ पुरुष गटात या चाचण्यांसाठी पात्र ठरला आहे. वेदिका आणि तनिष्का सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल सब-युवा महिला गटात, तर समर्थ चौधरीने 10 मीटर एअर पिस्तूल युवा पुरुष गटात राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली.
अकादमीचे प्रशिक्षक रईस मलिक आणि वाजिद मलिक यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, एकूण 6 खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आशिषने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावण्याचे ध्येय ठेवले असून, तो लवकरच स्वतःचे 50 मीटर पिस्तूल खरेदी करून जागतिक स्पर्धांच्या तयारीला लागणार आहे.