T20 Mumbai League: टी-20 मुंबई लीगचा अंतिम सामना क्रिकेटच्या थराराऐवजी मैदानातील गोंधळामुळे जास्त चर्चेत आला आहे. विजेतेपदासाठी सुरू असलेल्या या लढतीच्या शेवटच्या षटकांमध्ये दोन्ही संघांचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आमनेसामने आल्याने मैदानावर प्रचंड नाट्यमय घडामोडी घडल्या. ‘मराठा रॉयल्स’चा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि ‘एआरसीएस अंधेरी’चा फलंदाज गौरव जठार यांच्यात झालेल्या जोरदार शाब्दिक चकमकीमुळे मैदानावरील वातावरण कमालीचे तापले होते. या संपूर्ण वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अंधेरीचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय; रॉयल्सचे आव्हान
दरम्यान, 13 जून रोजी खेळल्या गेलेल्या या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात ‘एआरसीएस अंधेरी’ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. फलंदाजीसाठी उतरलेल्या ‘एमएससी मराठा रॉयल्स’ने चिन्मय राजेश सुतारच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 बाद 154 धावा फलकावर लावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अंधेरीच्या संघाने शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले, परंतु 20 षटकांत त्यांना 8 बाद 146 धावांपर्यंतच मजल मारता आली. अखेर मराठा रॉयल्सने या अत्यंत रोमांचक सामन्यात बाजी मारली.
हेही वाचा – IND vs AFG: पहिल्या वनडेत भारताचा 7 गडी राखून विजय; शुभमन गिलची नाबाद ८४ धावांची शानदार खेळी
19 व्या षटकात फिरले मॅचचे पारडे अन् ठिणगी पडली
सामन्याला खरे वेगळे वळण मिळाले ते 19 व्या षटकात. अंधेरीचा फलंदाज गौरव जठार वेगाने धावा काढत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने फिरकीपटू इरफान उमेरच्या चेंडूवर एक शानदार षटकार खेचून मराठा रॉयल्सला दबावाखाली आणले होते. मात्र, पुढच्याच चेंडूवर इरफानने जोरदार पुनरागमन केले आणि जठारला ‘एलबीडब्ल्यू’ (LBW) करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जठारने 17 चेंडूंमध्ये 23 धावांची खेळी केली. विकेट मिळाल्यानंतर मराठा रॉयल्सच्या खेळाडूंनी अतिउत्साहात केलेला आक्रमक जल्लोष जठारला रुचला नाही आणि तिथूनच वादाची ठिणगी पडली. जठार आणि तुषार देशपांडे यांच्यातील वाद इतका वाढला की पंचांना आणि इतर खेळाडूंना मध्ये पडावे लागले.
Big fight in T20 Mumbai final ?
For a second i thought they would hit each other ☠️ pic.twitter.com/Tlvo9xv2i8 — Heisenberg ?? (@Internetumpire7) June 14, 2026
डगआऊटपाशी पुन्हा राडा; सपोर्ट स्टाफ धावला
मैदानावरील वाद शांत झाल्याचे वाटत असतानाच, काही वेळातच हा वाद बाउंड्री लाईनजवळ पुन्हा उफाळला. मराठा रॉयल्सचा एक खेळाडू थेट ‘आर्कस अंधेरी’च्या डगआऊटच्या दिशेने गेला, जिथे कर्णधार शिवम दुबे यांच्यासह इतर राखीव खेळाडू बसले होते. तिथे गौरव जठार आणि त्या प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये पुन्हा एकदा थेट खडाजंगी सुरू झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि हिंसक वळण घेत असल्याचे पाहून दोन्ही बाजूंच्या सपोर्ट स्टाफने आणि खेळाडूंनी त्वरित धाव घेत मध्यस्थी केली आणि खेळाडूंना शांत केले.