Yashasvi Jaiswal: कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पहिल्याच दिवशी मैदानावर कमालीचा तणाव पाहायला मिळाला. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात थेट मैदानावरच वाद झाला. यशस्वी 45 धावांवर बाद होऊन माघारी परतत असताना ही घटना घडली. दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक बाचाबाची इतकी वाढली की ते एकमेकांच्या अगदी जवळ आले आणि त्यांच्यात हेल्मेटचा थेट संपर्क झाला. इतर खेळाडूंनी त्वरित मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र या घटनेमुळे आता आयसीसीच्या शिस्तभंगाच्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं मैदानावर काय घडलं?
भारताच्या डावातील 17 व्या षटकातील अंतिम चेंडूवर फर्नांडोने यशस्वीला त्रिफळाचित केले. 45 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाल्यानंतर यशस्वी तंबूकडे परतत असताना फर्नांडोने त्याला चिडवणारी टिप्पणी केली. यावर यशस्वीचा संयम सुटला आणि तो माघारी फिरून गोलंदाजाच्या दिशेने गेला. नॉन-स्ट्रायकर एंडवरील देवदत्त पडिक्कलने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन्ही खेळाडू आमनेसामने आले. याच दरम्यान दोघांचे डोके एकमेकांना भिडल्याने वाद अधिक पेटला. अखेर श्रीलंकेचे खेळाडू आणि मैदानातील पंचांनी दोन्ही खेळाडूंना बाजूला केले.
? THINGS GET HEATED! ? Yashasvi Jaiswal and Asitha Fernando exchange words as tensions rise in the middle. ? Watch #SLvIND, 2nd Test, LIVE NOW on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV #BeautifulGameOfTestCricket pic.twitter.com/7qJrORjx8V — Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 23, 2026
आयसीसीच्या नियमांनुसार शिक्षेची शक्यता
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) आचारसंहितेनुसार मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूशी शारीरिक संपर्क साधणे किंवा आक्रमक गैरवर्तन करणे हा गंभीर अपराध मानला जातो. हे प्रकरण जर आयसीसीच्या ‘लेव्हल-4’ उल्लंघनाच्या श्रेणीत धरले गेले, तर दोषी खेळाडूवर आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून बंदीची कारवाई होऊ शकते. या श्रेणीत 5 कसोटी किंवा 10 एकदिवसीय सामन्यांच्या निलंबनाची तरतूद आहे. मात्र, सामनाधिकाऱ्यांचा अधिकृत अहवाल आणि सुनावणीनंतरच यावर अंतिम निर्णय होणार आहे.