Women’s World Cup 2025: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2025 च्या महिला एकदिवसीय विश्वचषकात इतिहास रचला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी मात करत भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. या भव्य विजयावर बीसीसीआयने बक्षिसांचा वर्षाव केला असून, भारतीय संघाला एकूण 91 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाला आयसीसीकडून 40 कोटी रुपयांची अधिकृत बक्षीस रक्कम मिळाली. याशिवाय बीसीसीआयने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी 51 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. वृत्तांनुसार, प्लेइंग इलेव्हनमधील प्रत्येक खेळाडूला सुमारे 2 कोटी रुपयांचे वैयक्तिक बक्षीस, तर राखीव खेळाडूंना 1 कोटी पर्यंत बोनस मिळणार आहे. बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, ही रक्कम खेळाडूंच्या मेहनतीची आणि समर्पणाची खरी दाद आहे.
हेही वाचा - Asia Cup 2025: BCCI कडून रायझिंग स्टार्स एशिया कपसाठी भारत अ संघाची घोषणा; जीतेश शर्मा करणार नेतृत्व
पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी
दुसरीकडे, पाकिस्तान महिला क्रिकेट संघासाठी हा विश्वचषक विस्मरणीय ठरला. त्यांनी स्पर्धेतील सर्व सामने गमावले आणि गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर राहिले. परिणामी, संघाला फक्त आयसीसीकडून मिळणारी ठरलेली बक्षीस रक्कम 14.95 कोटी पाकिस्तानी रुपये (सुमारे 4.7 कोटी भारतीय रुपये) मिळाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कोणतेही अतिरिक्त बक्षीस घोषित केले नाही, ज्यामुळे खेळाडूंमध्ये निराशा पसरली आहे.
हेही वाचा - Indian Womens Cricket Team: महिला वर्ल्ड कप विजयानंतर खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू दुपटीने वाढली; कंपन्यांची स्पर्धा जाहिरातींसाठी
भारत आणि पाकिस्तानमधील बक्षिसांमध्ये मोठा फरक
बक्षिसांचा विचार केला तर, भारत आणि पाकिस्तानमधील फरक स्पष्टपणे दिसून येतो. भारताला 91 कोटी, तर पाकिस्तानला फक्त 4.7 कोटी रुपये मिळाले. हा आकडा दोन्ही संघांच्या मैदानावरील कामगिरीचा आणि क्रिकेट व्यवस्थापनातील व्यावसायिकतेचा स्पष्ट पुरावा ठरतो.