Friday, February 13, 2026 07:04:37 PM

T20 World Cup 2026 : ICC चा बांगलादेशला 'अल्टीमेटम'; भारताचा दौरा नाकारणे महागात पडणार

2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्याबाबत आयसीसीने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.

t20 world cup 2026  icc चा बांगलादेशला अल्टीमेटम भारताचा दौरा नाकारणे महागात पडणार

T20 World Cup 2026 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बांगलादेशला वगळण्याबाबत आयसीसीने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. जर बांगलादेशने भारतात आपला संघ पाठवण्यास नकार दिला, तर त्यांना स्पर्धेतून बाहेर केले जाईल आणि त्यांच्या जागी दुसऱ्या संघाला संधी दिली जाईल, असा इशारा आयसीसीने दिला आहे.

मतदानात बीसीबीचा दारूण पराभव

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आयसीसीची एक प्रदीर्घ बैठक पार पडली. या बैठकीत टी-20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या 16 देशांच्या प्रतिनिधींमध्ये मतदान झाले. यामध्ये 14 देशांनी आयसीसीच्या बाजूने मतदान केले, तर केवळ 2 देशांनी विरोधात भूमिका घेतली. विरोधात मतदान करणाऱ्यांमध्ये स्वतः बांगलादेश आणि त्यांना साथ देणारा पाकिस्तान होता, अशी चर्चा आहे. या बहुमतामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा अहंकार एका झटक्यात मोडला असून त्यांना आता भारताचा दौरा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

स्कॉटलंडच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

जर बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेतली किंवा त्यांना बाहेर काढले गेले, तर त्यांच्या जागी कोणत्या संघाला घ्यायचे, यावरही चर्चा झाली आहे. आयसीसीच्या क्रमवारीनुसार (Rankings) आता स्कॉटलंड हा संघ आघाडीवर आहे. युरोपियन पात्रता फेरीत नेदरलँड्स, इटली आणि जर्सी या संघांनी विजय मिळवल्यामुळे स्कॉटलंड बाहेर पडला होता. मात्र, बांगलादेशच्या संभाव्य गच्छंतीमुळे स्कॉटलंडला नशिबाने या मोठ्या स्पर्धेत स्थान मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा - T20 World Cup: भारतासोबत मैदानावर हरण्याची धास्ती? बांगलादेशच्या खांद्यावर बंदूक ठेवून पाकिस्तानचा वर्ल्ड कपवर बहिष्काराचा बनाव?

बीसीबीकडे केवळ १ दिवसाचा अवधी

आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला स्पष्ट सांगितले आहे की, त्यांनी त्यांच्या सरकारशी चर्चा करून अंतिम निर्णय कळवावा. बीसीबीकडे आता केवळ 1 दिवसाचा अवधी शिल्लक आहे. जर त्यांनी भारतात संघ पाठवण्यास अधिकृत संमती दिली, तरच ते विश्वचषक खेळू शकतील. अन्यथा त्यांना ऐतिहासिक नामुष्कीला सामोरे जावे लागेल. 


सम्बन्धित सामग्री