T20 World Cup 2026:आयसीसी टी२० वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीला सुरुवात झाली असून आता स्पर्धा अधिक रंगतदार टप्प्यात दाखल झाली आहे. साखळी फेरीत दमदार कामगिरी करत भारताने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. आता भारतासमोर बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान असले तरी एक असा नियम चर्चेत आला आहे, ज्यामुळे विशेष परिस्थितीत भारत एकही सामना न खेळता थेट उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
सुपर 8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे आहेत. या फेरीत सर्वाधिक गुण मिळवणारे दोन संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवतात. साधारणपणे दोन विजय मिळवणाऱ्या संघाचा मार्ग सुकर होतो. मात्र गुण समान राहिल्यास नेट रनरेटचा निकष लावला जातो. स्पर्धेतील काही सामन्यांवर पावसाचे सावट दिसून आले आहे. जर सुपर 8 मधील एखाद्या गटातील सर्व सामने पावसामुळे रद्द झाले, तर प्रत्येक संघाला प्रत्येकी एक गुण मिळेल. अशा वेळी तिन्ही संघांचे गुण समान म्हणजेच तीन-तीन होतील. शिवाय सामना न झाल्यामुळे नेट रनरेटही शून्यावरच राहील.
अशा परिस्थितीत पुढील टप्प्यासाठी पात्रता कशी ठरवली जाणार? आयसीसीच्या नियमांनुसार, गुण आणि नेट रनरेट समान असल्यास अधिकृत टी20 क्रमवारीचा आधार घेतला जातो. सध्या टी20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे जर सुपर 8 मधील सर्व सामने पावसामुळे रद्द झाले आणि गुणतालिकेत तिघेही संघ बरोबरीत राहिले, तर क्रमवारीतील वरच्या स्थानामुळे भारताला थेट सेमीफायनलचे तिकीट मिळू शकते.
मात्र ही केवळ तांत्रिक शक्यता आहे. प्रत्यक्षात भारतीय संघ मैदानात विजय मिळवूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. तरीही क्रिकेटप्रेमींमध्ये या नियमाची जोरदार चर्चा रंगली आहे. पावसाचा अडथळा किती आणि कोणत्या सामन्यांवर होतो, यावर पुढील समीकरणे ठरणार आहेत. आता सर्वांचे लक्ष सुपर 8 फेरीतील सामन्यांकडे लागले आहे. टीम इंडिया आपल्या कामगिरीनेच सेमीफायनलमध्ये स्थान मिळवते की परिस्थितीचा फायदा घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.