भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या ICC T20 World Cup 2026 पूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्डने (BCB) आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना भारतात पाठवण्यास इच्छुक नसून, यासंदर्भात त्यांनी International Cricket Council (ICC) ला दुसऱ्यांदा औपचारिक पत्र पाठवले आहे. यापूर्वीही BCB कडून खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता, मात्र तो ICC ने फेटाळून लावला होता.
ICC कडून पाठवण्यात आलेल्या पहिल्या उत्तरात, भारतातील सुरक्षाव्यवस्थेबाबत कोणतीही गंभीर अडचण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तरीही बांगलादेश क्रिकेट बोर्डने आता दुसऱ्यांदा पत्र पाठवून आपली चिंता पुन्हा मांडली आहे. रिपोर्टनुसार, BCB आणि बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार आसिफ नजरूल यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हे नवे पत्र ICC कडे पाठवण्यात आले आहे. या विषयावर आसिफ नजरूल यांनी कडक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
PTI शी बोलताना BCB शी संबंधित एका सूत्राने सांगितले की, “ICC ला नेमकी कोणती सुरक्षा चिंता आहे, याचे स्पष्टीकरण हवे होते. त्यामुळे BCB ने आपल्या पत्रात संपूर्ण तपशील दिला आहे.” सध्या ICC कडून या दुसऱ्या पत्रावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ICC T20 World Cup 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारी 2026 पासून होणार असून भारतासोबत श्रीलंका देखील या स्पर्धेचे सहयजमान असतील. मात्र, बांगलादेश संघाचे चारही सामने भारतातच नियोजित आहेत. यामध्ये कोलकात्यातील Eden Gardens येथे तीन सामने, तर मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे एक सामना खेळवला जाणार आहे. BCB च्या सध्याच्या भूमिकेमुळे स्पर्धेत बांगलादेशच्या सहभागावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाला वेग तेव्हा आला, जेव्हा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याला IPL 2026 मधून रिलीज करण्यात आले. त्यानंतर भारतात खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला.
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट बोर्डमध्येही या विषयावर मतभेद स्पष्टपणे दिसून येत आहेत. एक गट भारतात संघ पाठवण्याच्या पूर्णपणे विरोधात असून कोणत्याही तडजोडीस तयार नाही. तर दुसरा गट ICC आणि भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू ठेवण्याच्या भूमिकेत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर पूर्ण सुरक्षा हमी मिळाली, तर हा वाद मिटू शकतो.
आता ICC या दुसऱ्या पत्रावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.