Friday, March 06, 2026 02:33:29 PM

India Pakistan Cricket Match: 15 फेब्रुवारीच्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर; पीसीबीने आयसीसीसमोर ठेवली मोठी अट

सूर्यकुमार यादव याने भारत सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. अंतिम निर्णयाकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

india pakistan cricket match 15 फेब्रुवारीच्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर पीसीबीने आयसीसीसमोर ठेवली मोठी अट

कोलंबो: अवघ्या क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असलेल्या ICC T20 World Cup 2026 चा शंखनाद आजपासून होत असला, तरी चाहत्यांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केले आहे 'भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही?' येत्या 15 फेब्रुवारीला कोलंबोच्या मैदानात हा हाय व्होल्टेज सामना नियोजित आहे. मात्र, सीमेपलीकडील राजकीय वारे आता क्रिकेटच्या खेळपट्टीवर घोंगावू लागले असून, पाकिस्तानने या सामन्यातून माघार घेण्याचे संकेत दिल्याने क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

सूर्याचा ठाम निर्णय

भारतीय संघाचा कर्णधार सूर्याकुमार यादव याने या वादावर त्याची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक मांडली आहे. पाकिस्तानच्या बहिष्कार घालण्याच्या चर्चेवर विचारले असता सूर्याने मिश्किल पण ठामपणे उत्तर दिले, "आम्ही खेळायला कधीच नकार दिलेला नाही. आमचा मानस स्पष्ट आहे, आमची तयारी पूर्ण झाली असून 15 फेब्रुवारीच्या सामन्यासाठी आमची फ्लाईटही आधीच बुक आहे." सूर्याच्या या विधानामुळे भारतीय संघ मैदानावर उतरण्यास सज्ज असल्याचे सिद्ध झाले असून, आता चेंडू पूर्णपणे पाकिस्तानच्या कोर्टात आहे.

हेही वाचा: Mumbai Crime: हा कसला शौक! चक्क घरात पाळली होती जिवंत मगर; वन विभाग व क्राईम ब्रँचच्या कारवाईनंतर सर्व प्रकार उघडकीस

पाकिस्तानच्या गोटात हालचाली; पीसीबीच्या अटी काय?

एका वृत्तानुसार, International Cricket Council (ICC) सध्या Pakistan Cricket Board (PCB) सोबत पडद्यामागून चर्चा करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानने हा सामना खेळण्यासाठी आयसीसीसमोर काही गुप्त अटी ठेवल्या आहेत. गेल्या 48 तासांत या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघण्याची चिन्हे दिसत असली, तरी अद्याप पीसीबीने अधिकृतपणे आयसीसीला कोणताही ई-मेल केलेला नाही. ही 'वेट अँड वॉच'ची भूमिका क्रिकेट चाहत्यांची धाकधूक वाढवणारी ठरत आहे.

बांगलादेशच्या बहिष्काराचा 'डोमिनो इफेक्ट'

या सर्व वादाची मुळे Bangladesh Cricket Board (BCB) च्या भूमिकेत दडलेली आहेत. सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला होता, ज्यामुळे आयसीसीने त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला. या निर्णयामुळे दुखावलेल्या पाकिस्तानने आता बांगलादेशशी 'राजकीय एकता' दर्शवण्यासाठी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उपसले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनीही कॅबिनेट बैठकीत "आम्ही बांगलादेशच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," असे म्हणत या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त आहे.

मैदानावर 'वॉकओव्हर' की हाय-व्होल्टेज थरार?

जर पाकिस्तानचा संघ 15 फेब्रुवारीला मैदानात उतरला नाही, तर आयसीसीच्या कडक नियमांनुसार टीम इंडियाला 'वॉकओव्हर' दिला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताला विनासायास गुण मिळतील, मात्र कोट्यवधी क्रिकेटप्रेमी एका रोमहर्षक सामन्याला मुकतील. श्रीलंकन क्रिकेट बोर्डानेही या सामन्यातून होणाऱ्या अफाट आर्थिक नुकसानीची भीती व्यक्त केली आहे. आता आयसीसी या कोंडीतून मार्ग काढण्यात यशस्वी होते की 'क्रिकेटच्या जगात' राजकारण बाजी मारते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा: BCCI Annonces Prize: विजेत्या युवा शिलेदारांवर पैशांचा पाऊस; BCCI कडून साडेसात कोटींचे बक्षीस जाहीर; खेळाडूंच्या वाट्याला येणार 'इतकी' रक्कम


सम्बन्धित सामग्री