दुबई: आशिया कप 2025 सुपर-4 फेरीत झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने स्पर्धेत अव्वल स्थान मिळवत सलग दुसऱ्यांदा पाकिस्तानवर मात केली आहे. भारताच्या या यशामुळे संघाने गुणतालिकेत आणखी दोन मौल्यवान गुणांची भर घातली.
दुसऱ्या डावात भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले तेव्हाच वातावरण तणावपूर्ण झाले. पहिल्याच षटकात शाहीन शाह अफ्रिदीने अभिषेकला काहीतरी सांगितले, त्यावर अभिषेकने प्रत्युत्तर दिले. शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनी हारिस रौफलाही स्लेज केले. शाहीन शाह अफ्रिदी अभिषेक शर्माला काहीतरी बोलला. यावर अभिषेकने देखील चल..भोस…, असं म्हणत त्याला उत्तर दिले. यादरम्यान व्हिडीओ देखील सोशल मीडियावर पसरत आहे.
हेही वाचा: IND vs PAK: भारताचा पुन्हा एकदा दणदणीत विजय, पाकिस्तानला सहा विकेट्सने लोळवलं
पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करताना 105 धावांची भागीदारी केली. अभिषेक शर्माने 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह झंझावाती 74 धावा केल्या. शुभमन गिलने 47 धावा करून साथ दिली. पुढे संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी शांत फलंदाजी करत विजय निश्चित केला.
सामन्यानंतर पुन्हा एकदा हस्तांदोलनाचा मुद्दा समोर आला. याआधी गट फेरीत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाक खेळाडूंशी हात न मिळवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच भूमिकेवर ठाम राहत भारताने सुपर-4 नंतरही पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन टाळले. खेळाबरोबरच ही घटना चर्चेचा ठळक मुद्दा ठरली.