मुंबई: भारत आणि इंग्लंडमधील पहिला टी २० सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात झाला. दोन्ही संघातले खेळाडू बघून हा सामना अटीतटीचा होईल अशा अपेक्षा होत्या. पण, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या खेळाडूंना सुरवातीपासूनच बॅकफूटवर टाकले.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य आहे हे सामन्याच्या सुरवातीपासूनच सिद्ध केले. भारताचा वेगवान गोलंदाज अर्षदिप सिंगने इंग्लंडचा आक्रमक फलंदाज फिल सॉल्टला सामन्याच्या तिसऱ्या चेंडूवर बाद केले. तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्षदिपने बेन डकेटला बाद केलं. इंग्लंडची स्तिथी 2 बाद 17 अशी होती आणि आणि मैदानात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि उपकर्णधार हॅरी ब्रुक आला. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत सामन्यात स्वतःच्या संघाचे पुनरागमन केले. 65 धावांवर इंग्लंडचा तिसरा गडी बाद झाला त्यानंतर मात्र इंग्लंडचा डाव सावरू शकला नाही. वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेलच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ 3 बाद 65 वरून 8 बाद 109 असा झाला. जोस बटलरने एकाकी झुंझ देत संघाचा स्कोर 132 धावांपर्यंत नेला. बटलरने 44 चेंडूतn68 धावा केल्या. भारताकडून वरूण चक्रवर्तीने 3 तर हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि अर्षदिप सिंगने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
भारताचा सलामीवीर संजू सॅमसनने सुरवातीला आक्रमक फलंदाजी केली. भारताने पाहिल्या ४ ओव्हर्समध्ये ४० धावा केल्या. ६ ओव्हर्समध्ये भारताने ६० धावांचा टप्पा गाठला. संजू सॅमसन २६ च्या धावसंख्येवर बाद झाला. तर सूर्यकुमार यादव आपलं खातंदेखील खोलू शकला नाही. अभिषेक शर्माने मात्र आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. त्याने 34 चेंडूत 79 धावा केल्या आणि तो बाद झाला. भारताला 8 धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. भारताने 43 चेंडू शिल्लक ठेवत हा सामना जिंकला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने 2 तर आदिल राशीदने 1 गडी बाद केला.
वरूण चक्रवर्तीच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.