India vs Namibia: नामिबियाविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने आक्रमक पवित्रा घेतला. भारताने नामिबियासमोर 210 धावांचे महाकाय लक्ष्य उभे केले आहे. सलामीवीर इशान किशनने सुरुवातीपासूनच नामिबियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने अवघ्या 24 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावांची स्फोटक खेळी केली. इशानच्या या खेळीमुळे भारताने पॉवरप्लेमध्येच मोठी धावसंख्या उभारली. मात्र, 8 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने त्याला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. 8 षटकाअखेर भारताची धावसंख्या 2 बाद 105 इतकी होती.
मध्य फळीतील संघर्ष आणि हार्दिकचे अर्धशतक
इशान बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात आला, मात्र तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार 13 चेंडूत केवळ 12 धावा करून माघारी परतला. त्यानंतर टिळक वर्माने 21 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. 12 व्या षटकात टिळक वर्मा बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. हार्दिकने आक्रमक फलंदाजी करत 52 धावांची शानदार खेळी केली. 16 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 184 पर्यंत पोहोचली होती, ज्यामध्ये हार्दिकने अवघ्या 20 चेंडूत 41 धावा कुटल्या होत्या.
हेही वाचा - T20 World Cup: 'आम्ही 'मॅच मोड'मध्ये आलोय'; भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यावर तिलक वर्माने स्पष्टच सांगितलं...
शेवटच्या षटकांत पडझड आणि नामिबियाचे पुनरागमन
भारताची धावसंख्या सहजासहजी 230 च्या पुढे जाईल असे वाटत असतानाच, शेवटच्या दोन षटकांत भारतीय डावाला मोठी गळती लागली. 19 व्या षटकात हार्दिक पंड्या (52), शिवम दुबे (23) आणि अक्षर पटेल (0) हे तिन्ही खेळाडू बाद झाले. नामिबियाच्या गोलंदाजांनी शेवटच्या 12 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा देत भारताचे 5 गडी टिपले. यामुळे भारताला 20 षटकांत 9 बाद 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने सर्वाधिक 4 बळी घेत भारतीय फलंदाजीला खिळ लावली. आता नामिबियाला विजयासाठी 210 धावांचे कठीण लक्ष्य गाठायचे आहे.