Commonwealth Games 2030: भारतासाठी क्रीडा क्षेत्रात आनंदाची बातमी आली आहे. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासभेत भारताच्या अहमदाबाद शहराला 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले आहे. हे भारताचे दुसरे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद ठरणार असून, यापूर्वी 2010 मध्ये ही स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
अहमदाबाद 2030 मध्ये 15 ते 17 खेळांचे आयोजन करेल. आतापर्यंत अॅथलेटिक्स, पॅरा-अॅथलेटिक्स, पोहणे, पॅरा-स्वीमिंग, टेबल टेनिस, पॅरा-टेबल टेनिस, बाउल्स, पॅरा-बाउल्स, वेटलिफ्टिंग, पॅरा-पॉवरलिफ्टिंग, कलात्मक जिम्नॅस्टिक्स, नेटबॉल, बॉक्सिंग हे खेळ निश्चित झाले आहेत. त्याशिवाय, तिरंदाजी, बॅडमिंटन, 3×3 बास्केटबॉल, 3×3 व्हीलचेअर बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, टी20 क्रिकेट, सायकलिंग, डायव्हिंग, हॉकी, ज्युडो, रिदमिक जिम्नॅस्टिक्स, रग्बी सेव्हन्स, शूटिंग, स्क्वॅश, ट्रायथलॉन, पॅरा-ट्रायथलॉन आणि कुस्ती यांचा समावेश अंतिम यादीत होण्याची शक्यता आहे. यजमान शहर दोन नवीन किंवा पारंपारिक खेळ देखील प्रस्तावित करू शकते.
कॉमनवेल्थ गेम्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा डॉ. पीटी उषा यांनी म्हटलं आहे की, ‘कॉमनवेल्थ गेम्सने आमच्यावर दाखवलेला विश्वास आमच्यासाठी गौरवाचा विषय आहे. 2030 चे खेळ फक्त शताब्दीचे उत्सव नसून, आगामी शतकासाठी पायाभूत ठरणार आहेत. हे खेळ कॉमनवेल्थ देशांमधील खेळाडू, समुदाय आणि संस्कृती एकत्र आणतील.’
?The 2030 Commonwealth Games will be hosted by Amdavad, India!! At the Commonwealth Sport General Assembly in Glasgow, Commonwealth Games Northern Ireland was delighted to support the awarding of hosting rights for the 2030 Games to the city of Amdavad, India! pic.twitter.com/SDV3esnp1C — Commonwealth Games Northern Ireland (@GoTeamNI) November 26, 2025
कॉमनवेल्थ गेम्सचे अध्यक्ष डॉ. डोनाल्ड रुकारे यांनी सांगितले की, ‘2030 चे गेम्स नव्या सुवर्णयुगाची सुरुवात ठरणार आहेत. ग्लासगो 2026 नंतर आम्ही 2030 चे खेळ अहमदाबाद येथे आयोजित करण्यासाठी सज्ज आहोत.’ या निर्णयामुळे भारताचे क्रीडा क्षेत्र आणि अहमदाबाद शहराचे जागतिक स्तरावर महत्त्व वाढेल तसेच देशातील खेळाडूंना उच्च दर्जाच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.