World Boxing Cup: भारताच्या मीनाक्षी हुडाने वर्ल्ड बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत 48 किलो गटात जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत तिने उझबेकिस्तानच्या फोझिलोवा फरझोनावर 5-0 ने विजय मिळवला. सुरुवातीच्या फेरीपासून मीनाक्षीने आघाडी घेतली आणि ती अखेरीस अखंड ठेवली. विजयानंतर मीनाक्षीने सांगितले, 'ही स्पर्धा भारतात असल्याने माझा उत्साह खूप होता. देशासाठी सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा आमचा हेतू होता. प्रत्येक सामना 5-0 ने जिंकला. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. वर्ल्ड चॅम्पियन होणे सोपे आहे, पण टिकवणे कठीण. मी खूप आनंदी आहे कारण, मी देशासाठी सुवर्णपदक जिंकू शकले.'
मीनाक्षीला तिच्या चांगल्या कामगिरीमुळे इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) मध्ये नोकरीही मिळाली, ज्यामुळे तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही सुधारली. 2 ऑगस्ट 2001 रोजी हरियाणातील रुरकी येथे जन्मलेली मीनाक्षी 12 वर्षांच्या वयात स्थानिक बॉक्सिंग अकादमीमध्ये प्रशिक्षण घेऊ लागली. 2019 मध्ये युथ नॅशनल्समध्ये सुवर्णपदक आणि 2021 मध्ये सिनियर नॅशनल्समध्ये रौप्यपदक मिळवले. 2022 मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकून तिने आपली क्षमता सिद्ध केली.
प्रीती पवारने 54 किलो गटात जिंकले सुवर्णपदक
दरम्यान, याच स्पर्धेत भारताच्या प्रीती पवारने 54 किलो गटात इटलीच्या सिरिन चाराबीला 5-0 ने हरवून सुवर्णपदक जिंकले. प्रीतीने सांगितले, 'मी पुन्हा उठले आहे आणि मजबूत झाले आहे. भविष्यात आशियाई खेळ, राष्ट्रकुल आणि 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकसाठी तयारी सुरू आहे.' मीनाक्षी आणि प्रीती यांच्या या विजयानंतर भारताचा बॉक्सिंगमध्ये जागतिक स्तरावर गौरवाचा झेंडा फडकला आहे.