मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 मालिकेतील चौथा सामना पुण्याच्या एमसीए क्रिकेट ग्राऊंडवर झाला. हा सामना भारताने 15 धावांनी जिंकून भारताने ही मालिका स्वतःच्या नावावर केली आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरवातीला छान गोलंदाजी करत भारताला खराब परिस्थितीत आणलं. इंग्लंडच्या संघात पुनरागमन करणाऱ्या साकिब मेहमूदने पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव न देता 3 गडी बाद केले. त्याने सुंजू सॅमसनला 4 वर बाद केलं तर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवला खातं उघडण्याची देखील संधी नाही दिली. भारताची स्तिथी 3 बाद 12 अशी झाली होती. त्यांनतर सलामीवीर अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग या दोन्ही खेळाडूंनी 45 धावा अजून जोडल्या. मात्र, 57 च्या धावसंख्येवर भारताने अभिषेक शर्माच्या रूपात चौथा गडी गमावला.
अभिषेक बाद झाल्यांनतर मैदानात आला मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे. दुबेने त्याच्या डावाची सुरवात सांभाळत केली. 79 च्या धावसंख्येवर रिंकू सिंग बाद झाला. रिंकू बाद झाल्यावर मैदानात झाले हार्दिक पांड्याचे आगमन. हार्दिकने सुरवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत दुबेवरचा दबाव हटवला. त्याच्या या आक्रमक पवित्र्याने इंग्लंडचे गोलंदाज दबावाखाली आले. हार्दिक पाठोपाठ दुबेनेदेखील हात मोकळे करायला सुरवात केली. हार्दिक आणि शिवमने 45 चेंडूत 87 धावा जोडल्या. भारताचा डाव 79 वरून 166 वर नेत भारताला एका चांगल्या स्तिथीत आणून ठेवलं. हार्दिकने 30 चेंडूत 53 धावा केल्या. तर शिवम दुबेने 34 चेंडूत 53 धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने 181 धावा गाठल्या.
इंग्लंड संघाने सुरवातीला आक्रमक फलंदाजी केली. विशेष करून बेन डकेटने. त्याने 19 चेंडूत 39 धावा केल्या. रवी बिश्नोईंने त्याला बाद केले. इंग्लंड संघाने 6 ओव्हर्समध्ये 62 धावा केलेल्या. मात्र, त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. डकेट पाठोपाठ बटलर आणि फिल सॉल्टदेखील बाद झाले. इंग्लंडचा उपकर्णधार हॅरी ब्रुक मैदानात आला आणि त्याने आक्रमक फलंदाजी सुरु केली. परंतु, त्याला हवी तशी साथ बाकी फलंदाजांकडून मिळाली नाही. लिअम लिविंगस्टन, जेकब बेथल आणि ब्रेडन कार्स 10 धावांच्या पुढेदेखील पोहचू शकले नाहीत. हॅरी ब्रूक बाद होतांच इंग्लंडच्या सामना जिंकायच्या अपेक्षा संपुष्टात आल्या. भारतातर्फे हर्षित राणा आणि रवी बिष्णोईने प्रत्येकी 3-3 गडी बाद केले. तर अर्षदिप सिंग आणि अक्षर पटेलने 1-1 गडी बाद केला. तर वरुण चक्रवर्तीने 2 गडी बाद केले. शिवम दुबेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.
यासर्वात वादग्रस्त ठरलं ते शिवम दुबेच्या जागी हर्षित राणाचं येणं.
शिवम दुबेला डोक्यावर चेंडू लागल्याने त्याचा जागी 'Concussion Substitute' म्हणून हर्षित राणाला संघात समाविष्ट करण्यात आलं. भारताचा या निर्णयावर इंग्लंड संघाने नाराजी प्रकट केली. इंग्लंड संघाचे म्हणणे होते की हर्षित राणा हा बदली खेळाडू म्हणून योग्य नाही. एक खेळाडू फलंदाज आहे तर दुसरा गोलंदाज, तसेच दोघांच्या गोलंदाजीच्या वेगातदेखील खूप फरक आहे आणि हर्षित हा मुखतः गोलंदाज आहे.