वडोदरा येथील पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असली, तरी भारतीय गोटातून एक चिंतेची बातमी समोर आली आहे. विजयाचा जल्लोष सुरू असतानाच एका स्टार अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीने चाहत्यांचे टेन्शन वाढवले आहे. हा खेळाडू आता मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांना मुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मैदानात चपळ हालचाली आणि अचूक फिरकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूला सामन्यादरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागले. गोलंदाजी करत असतानाच त्याच्या शरीरात ओढ (Stretch) जाणवली आणि वेदनेने तो मैदानातच वाकला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून टीम इंडियाचा मेडिकल स्टाफ तातडीने धावून आला आणि काही वेळातच या खेळाडूला मैदान सोडावे लागले. हा खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा भरवशाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आहे.
वॉशिंग्टन सुंदरला नेमकी काय दुखापत झाली आहे, याबाबत चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. सामन्यानंतर वेगवान गोलंदाज हर्षित राणाने यावर अधिकृत अपडेट दिली. तो म्हणाला की, "वॉशिंग्टनला 'साइड स्ट्रेन' (Side Strain) चा त्रास होत आहे. पाचव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना त्याला ही समस्या जाणवली. फलंदाजी करतानाही तो खूपच अस्वस्थ होता आणि त्याला धावा पळताना प्रचंड त्रास होत होता. सध्या मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे."
विशेष म्हणजे, दुखापत झालेली असतानाही सुंदरने दाखवलेली जिद्द कौतुकास्पद ठरली. टीमला गरज असताना तो आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला आणि सात चेंडूत नाबाद सात धावा करून 17 मिनिटं क्रीजवर तग धरला. मात्र, 'साइड स्ट्रेन' ही दुखापत गंभीर मानली जाते, त्यामुळे तो पुढच्या दोन सामन्यांत खेळण्याबाबत मोठी अनिश्चितता आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, तो या मालिकेतून पूर्णपणे बाहेर होऊ शकतो.
जर वॉशिंग्टन सुंदर मालिकेतून बाहेर झाला, तर ऋषभ पंतनंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकणारा तो दुसरा मोठा खेळाडू ठरेल. पंतच्या जागी आधीच ध्रुव जुरेलचा समावेश करण्यात आला आहे. आता सुंदरच्या जागी बीसीसीआय कोणाला संधी देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच्या जागी एखाद्या फिरकी अष्टपैलूचा संघात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.