नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 15 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये रंगलेला आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 सामना मैदानावरील थरारासोबतच डिजिटल विश्वातही नवे विक्रम प्रस्थापित करणारा ठरला. अधिकृत डिजिटल आणि ब्रॉडकास्ट भागीदार जिओस्टार (JioStar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सामन्याने तब्बल 16 कोटी 30 लाख डिजिटल रीच (Digital Reach) नोंदवत टी20 विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक पाहिला गेलेला सामना ठरला.
विशेष म्हणजे, या सामन्याने भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2024 च्या अंतिम सामन्याचाही विक्रम मागे टाकला. भारत-पाकिस्तान लढतीला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर मिळून तब्बल 20 अब्ज मिनिटांचा (2000 कोटी मिनिटे) वॉच टाइम (Watch Time) नोंदवण्यात आला. 2024 च्या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याच्या तुलनेत यंदा प्रेक्षकसंख्येत 56 टक्क्यांची वाढ झाली.
मैदानावरील कामगिरीतही भारतीय संघाने दमदार खेळ करत पाकिस्तानवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळवला आणि सुपर एट फेरीत अपराजित प्रवेश केला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या पाकिस्तानला सुरुवातीला अभिषेक शर्माची विकेट मिळाली, मात्र त्यानंतर ईशान किशन याने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचे चित्रच बदलले.
शाहीन शाह आफ्रिदी याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत किशनने आक्रमणाची सुरुवात केली. तिलक वर्माच्या साथीत भारताने पॉवरप्लेमध्ये 52 धावांची भक्कम सुरुवात केली. किशनने अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत 40 चेंडूत शानदार 77 धावांची खेळी साकारली. सूर्यकुमार यादवने 32, शिवम दुबेने 27 आणि रिंकू सिंग याने 11 धावांचे योगदान दिल्याने भारताने सात बाद 175 धावांपर्यंत मजल मारली.
पाकिस्तानने या डावात तब्बल सहा फिरकी गोलंदाजांचा वापर केला, जो टी20 विश्वचषकातील विक्रमी प्रयोग ठरला. साईम अयुब याने तीन बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली, मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाज टिकू शकले नाहीत.
उस्मान खानची 44 धावांची खेळी वगळता पाकिस्तानचा डाव संघर्षमय राहिला आणि संपूर्ण संघ 17.5 षटकांत 114 धावांत गारद झाला. मैदानावरील शानदार प्रदर्शन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील विक्रमी प्रतिसादामुळे हा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चिला गेलेला भारत-पाकिस्तान सामना ठरला आहे.