IND vs ZIM 1st T20I: आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्याची दमदार सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला तो 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी. त्याने अवघ्या 18 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने झंझावाती अर्धशतक झळकावत भारताचा विजय सोपा केला. या खेळीमुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रमही आपल्या नावावर केला.
मयंक आणि प्रिन्स यादवची प्रभावी गोलंदाजी
हरारे येथे झालेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत झिम्बाब्वेला 20 षटकांत 7 बाद 125 धावांपर्यंत मर्यादित ठेवले. यजमानांकडून वेस्ली मधेवेरेने 39 धावा, तदिवनाशे मारुमानीने नाबाद 27 धावा, तर रायन बर्लने 26 धावांचे योगदान दिले. भारताकडून मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 2 बळी घेत झिम्बाब्वेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 1 बळी घेत त्यांना चांगली साथ दिली. पदार्पण करणाऱ्या अशोक शर्माला मात्र या सामन्यात विकेट मिळवता आली नाही.
वैभवचा धडाका; ईशान आणि तिलकने विजयावर शिक्कामोर्तब केले
126 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीलाच धक्का बसला आणि अभिषेक शर्मा अवघ्या 1 धावेवर बाद झाला. मात्र, त्यानंतर वैभव सूर्यवंशीने आक्रमक फलंदाजी करत झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. त्याने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारताची धावगती वाढवली. 7व्या षटकात 50 धावांवर तो बाद झाला, तेव्हा भारताच्या धावफलकावर 68 धावा लागल्या होत्या. त्यानंतर ईशान किशनने 35 धावांची संयमी खेळी केली, तर कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला चांगली साथ देत संघाची धावसंख्या शंभरीपार नेली.
तिलक वर्माचा विजयी फटका; श्रेयस अय्यरचा विजयाचा दुष्काळ संपला
12व्या षटकात ईशान किशन बाद झाल्यानंतर उपकर्णधार तिलक वर्माने जबाबदारी स्वीकारली. त्याने 14व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर विजयी चौकार ठोकत भारताला सहज विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने मालिकेत आघाडी घेतलीच, शिवाय कर्णधार म्हणून सलग 7 सामन्यांनंतर श्रेयस अय्यरला विजयाची चव चाखता आली. वैभव सूर्यवंशीच्या ऐतिहासिक खेळीमुळे भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याची सुरुवात संस्मरणीय ठरली.